MarathawadaNewsUpdate : परभणीत सध्या स्थिती काशी आहे ? पोलिसांकडून बळाचा वापर, जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड

परभणी : संविधान अवमानना प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या परभणी बंदला दुपारनंतर हिंसक वळण लागले. त्यामुळे पोलिसांना आश्रुधुराचे नळकांडे फोडून बळाचा वापर करावा लागला. शिवाय अग्नीशामकच्या वाहनातून आंदोलकांवर पाण्याचा फवारा मारून त्यांना पंगविण्यात आले. ठिकठिकाणी रस्त्यावर पेटविलेल्या टायरची आगही अग्निशमन दलाने विझविली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
सकाळपासूनच हे आंदोलन सुरू झाले होते. जिंतूर मार्ग, पाथरी मार्ग वसमत रोडवर विविध ठिकाणी आंदोलकांनी ठिय्या मांडला होता. तसेच टायरही जाळून वाहतूक रोखण्यात आली होती. याशिवाय शहरातील इतर काही मार्गांवरही अशीच परिस्थिती होती. मात्र दुपारनंतर वातावरण चिघळले. आंदोलकांनी स्टेशन रोड परिसरात दुकानाचे शटर, फलक, दुचाकी, चारचाकी वाहनांवर दगडफेक सुरू केली. रस्त्यावर फलक आणून ते जाळण्यात आले. तोपर्यंतही पोलिस बघ्याच्या भूमिकेतच होते. मात्र एक वाहन तोडफोड करून जाळल्यानंतर आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसताच पोलिस कुमक वाढविली. त्यांनी बळाचा वापर गर्दीवर नियंत्रण मिळवून ती पांगविण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांकडून बळाचा वापर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीकचा जमाव मात्र तसाच होता. शिवाय स्टेशन रोडवर दगडफेक सुरूच होती. त्यानंतर हा जमाव पोलिसांच्या वाहनांवर चालून गेला. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात पोलिस वाहनांवर दगडफेक झाली. पोलिसांवर लाठ्यांनी हल्लाही झाला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा वाढीव कुमक मागवून शहरातील विविध भागात आंदोलकांना पिटाळून लावले. यात काही ठिकाणी आश्रुधुराचाही वापर झाला. आंदोलकांनी दगडफेक केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केल्याने पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वसमत रोड भागातही पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली.
शहरात जमावबंदी आदेश , इंटरनेट ही बंद ….
शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधान प्रतिकृतीच्या नुकसानीमुळे निषेधासाठी जमलेल्या जमावाने आंदोलनाला हिंसक वळण दिले. जिल्ह्यात कलम ३७ (१) अन्वये जमावबंदी लागू असतानाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्याने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू केले आहे.
शहर व जिल्ह्यात असलेले तणावाचे वातावरण पाहता हे कलम लावण्याची विनंती पोलिस अधीक्षकांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ते लागू केले. यामुळे जिल्हाभर सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध आहे. भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स केंद्र, ध्वनिक्षेपके व इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश केले आहेत. ११ डिसेंबरच्या दुपारी १ वाजेपासून हे आदेश लागू राहतील. ध्वनिक्षेपकावरून ते पोलिसांनी जाहीर करावे, असेही आदेशात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड
दुपारी आंदोलन चिघळल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, आंदोलक यांची बैठक घेतली. जिल्हाधिकारी गावडे यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. सर्वांना शांततेचे आवाहन करण्यात आले. मात्र, याच वेळी अचानक आंदोलक महिलांचा एक घोळका जिल्हाधिकारी कार्यालयात घुसला आणि त्यांनी तोडफोड सुरू केली. एकीकडे शहरात तणावपूर्ण शांतता असताना पुन्हा आंदोलन चिघळल्याची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.