BeedNewsUpdate : संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तीन आरोपींना अटक ….

बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आणखी एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे. प्रतिक भीमराव घुले ( वय 25, रा.टाकळी ता.केज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर जयराम माणिक चाटे (वय 21 रा.तांबवा ता. केज), महेश सखाराम केदार (वय 21 रा. मैंदवाडी ता.धारुर) हे आरोपी अगोदरच पोलिसांनी अटक केले आहेत. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
आरोपी प्रतिक हा खून केल्यानंतर पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली या आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, मस्साजोग गावचे संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलनं आणि रस्ता रोको करण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती.
या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची गावकऱ्यांची मागणी केली होती. ती मागणी देखील मान्य करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिली.