Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : गुंता सुटला , राज्यात पुढील ४८ तासात नवीन सरकार !! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री !!

Spread the love

मुंबई : गेल्या १० दिवसांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना आता वेग आला आहे. भाजपाच्या विधिमंडळ आमदारांच्या बैठकीत नेता निवड प्रक्रिया पार पडली असून त्यानंतर दुपारी साडे तीनच्या सुमारास महायुतीचे नेते राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. या भेटत राज्यपालांकडे महायुती सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यामुळे राज्यात पुढील ४८ तासांत नवीन सरकार स्थापन होणार आहे.

दरम्यान आज पार पडलेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची एकमताने गटनेतेपदी निवड झाली आहे. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता.या प्रस्तावाला गोपीचंद पडळकर (धनगर) , संजय सावकारे (SC), योगश सागर (गुजराती), संभाजी पाटील (मराठा), मेघना बोर्डीकर (महिला मराठा) सुधीर मुनगंटीवार ( कुमटी), अशोक ऊईके (आदिवासी) आशिष शेलार (मराठा मुंबई), पंकजा मुंडे (ओबीसी) अशा सर्व समाजाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांना अनुमोदन केले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गटनेता पदासाठी आणखी कुणाचा प्रस्ताव आहे का? अशी विचारणा आमदारांना केली.त्यानंतर आमदारांनी नाही म्हटल्यावर रूपानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड केल्याची घोषणा केली आहे.

भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदाची घोषणा झाल्यानंतर तेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री असणार आहे. भाजपाने यंदाच्या निवडणुकीत १३२ जागा मिळवल्या आहेत. पहिल्यांदाच इतका मोठा विजय भाजपाने महाराष्ट्रात मिळवला आहे. त्यामुळे आज विधिमंडळ बैठकीसाठी विधानभवन फुलांनी सजवलं आहे. उद्या ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्र्‍यांसह अन्य मंत्र्‍यांचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

महायुतीच्या शपथविधीची पहिली पत्रिका आली समोर….

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा उद्या सायंकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. तत्पुर्वी या शपथविधीची पहिली पत्रिका समोर आली आहे. या पत्रिकेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा स्पष्ट उल्लेख आहे.या पत्रिकेचा फोटो आता समोर आला आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड होण्यापूर्वीच निमंत्रण पात्रिका व्हायरल झाल्यामुळे यावरून सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे. शिवाय या  पत्रिकेत केवळ देवेन्द्र फडणवीस यांच्याच नावाचा समावेश असल्यामुळे शपथविधी एकट्याचाच होणार का ? हा ही प्रश्न विचारला जात आहे.

महायुतीच्या शपथविधी सोहळा उद्या गुरूवारी सायंकाळी पार पडणार आहे.या शपथविधी सोहळ्याचा पहिली निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. या पत्रिकेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असा स्पष्ट उल्लेख आहे. त्याचसोबत या पत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती छापण्यात आली आहे.यासोबत शपथविधीची तारीख आणि वेळ देखील सांगण्यात आली आहे.

शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याला ७० हून अधिक व्हीव्हीआयपी नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, विशेष बाब म्हणजे, या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील ४०० हून अधिक साधू-संतांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय, विविध समाजाच्या प्रतिनिधींनाही निमंत्रणे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करण्यात आलेल्या संतांमध्ये जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज, गोविंददेव गिरी महाराज, बागेश्वर बाबा, महामंडलेश स्वामी विश्वेश्वरानंद महाराज, जैन संत लोकेश मुनी, बंजारा संत, शीख संत, बौद्ध भिक्खू यांचा समावेश आहे. काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी आणि महाकाल मंदिराचे मुख्य पुजारी, यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मंदिरांच्या मुख्य पुजाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!