MaharashtraPoliticalNewsUpdate : महायुतीची आजची बैठक रद्द , एकनाथ शिंदे गावाकडे रवाना , उपमुख्यमंत्रीपदाला नकार ….

मुंबई : राज्यातील विधानसभेचा निकाल लागून सहा दिवस होत आले तरी बहुमत प्राप्त केलेल्या महायुतीने अद्याप सरकार स्थापन केलेले नाही. यासंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली होती. यावेळी भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्यासमोर उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव मांडण्यात आला. तर मुख्यमंत्रीपद हे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे हेदेखील मुख्यमंत्रिपदासाठी इच्छूक होते. मात्र, भाजपने नकार दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमधून माघार घेतली होती. यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदानंतर खालच्या पायरीवर असणारे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नसल्याची चर्चा आहे. दरम्यान आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. मात्र अचानकपणे महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे.
आपल्याऐवजी शिवसेनेतील अन्य एखाद्या नेत्याला उपमुख्यमंत्री पद द्यावे आणि मी सरकारमधून बाहेर राहीन, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मात्र, भाजपला एकनाथ शिंदे यांची ही भूमिका मान्य नसल्याचे समजते. शिवसेनेचे नव निर्वाचित आमदारांनीही शिंदे यांनी सरकारमध्ये आसावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी मागणी केल्याची माहिती आहे. मात्र, भाजप ही मागणी मान्य करेल, असे दिसत नाही.
याशिवाय, भाजपला महायुतीचे सरकार चालवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याची आवश्यकता आहे. गेल्या काही काळात एकनाथ शिंदे हे राज्यातील मराठा समाजाचा चेहरा बनले आहेत. मनोज जरांगे यांच्यासारखे मराठा आंदोलकही एकनाथ शिंदे यांच्याबाबत आदर बाळगून आहेत. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाचा पेच निर्माण झाल्यास महायुती सरकारला एकनाथ शिंदे यांची गरज लागू शकते.
दुसारीकडे , कालच्या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या मोबदल्यात भाजपकडे गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम यासारखी महत्त्वाची खाती मागितली आहेत. मात्र भाजप नेते त्यांची ही मागणी मान्य करतील असे दिसत नाही.
दरम्यान महायुतीच्या तीनही नेत्यांची आज पुन्हा मुंबईत बैठक होणार होती. अमित शाहांनी केलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार होती. परंतु महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस महायुतीची ही बैठक होणार नसून महाराष्ट्र भाजप गटनेता निवड झाल्यावर महायुतीची बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांच्या मूळगाव देरे सातारा येथे जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
एकनाथ शिंदेंचा पडलेला चेहरा चर्चेचा विषय….
काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा झाली होती. यावेळी झालेल्या फोटोसेशनवेळी एकनाथ शिंदे यांची देहबोली चर्चेचा विषय ठरली होती. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो काढताना एकनाथ शिंदे यांचे खांदे पडलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात उत्साह दिसत नव्हता. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सर्वकाही आलबेल असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांचा पडलेला चेहरा दिल्लीतील राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीत सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल,तर शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का?
दरम्यान राज्यातल्या नव्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यास एकनाथ शिंदेंनी ते स्वीकारावे असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना घातल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंची ठाण्यातली पत्रकार परिषद झाल्यानंतर अनेक नेत्यांनी शिंदेंना तशी विनंती केल्याचे समजते . काल दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शिंदेंची शिवसेनेच्या काही नेत्यांसोबत बैठक झाली. आपण सत्तेत राहूनच सरकार चालवावे असा सूर शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंसोबतच्या बैठकीत आळवला. त्यामुळे एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.