ट्रॅक्टर – दुचाकी अपघातात एकाच गावातील दोघांचा जागीच मृत्यू

वाशिम: ट्रॅक्टर – दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच गावातील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाशिम – शेलुबाजार मार्गावरील बाकलीवाल विहिरीच्या जवळ घडली आहे. या भीषण अपघातात मृत्यू झालेले दोन्ही मृत व्यक्ती हे एकाच गावातील रहिवाशी होते. बालू लगड आणि डिगांबर देशमुख अशी मृतांची नाव आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार डिगंबर गुलाबराव देशमुख हे काटा गावाकडून दुचाकीवर वाशिमकडे जात होते. तर बालू दगडू लगड हे वाशिमकडून काटा गावाकडे ट्रॅक्टरने जात होते. दोन्ही वाहन वेगात जात असताना बाकलीवाल यांच्या विहिरीजवळ दोन्ही वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यावेळी दुचाकीवर जाणारे देशमुख लांब रस्त्यावर फेकले गेले, त्यामुळे त्यांना जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघात झाल्यानंतर ट्रॅक्टर रस्त्याच्या कडे जाऊन पलटी झाला. ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालक वाहनाखाली दबल्या गेला आणि त्याचाही जागीच मृत्यू झाला.