MarathawadaNewsUpdate : तुमच्यासारखा विश्वासघातकी या इतिहासात कधी घडला नाही, जरांगे यांचा फडणविसांवर पुन्हा हल्ला बोल ..

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 4 नोव्हेंबरपर्यंत आपण आपला निर्णय जाहीर करू, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. त्यातच, पुन्हा एकदा भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या व्हिजन महाराष्ट्र कार्यक्रमातून जरांगे पाटील यांचा रोष आपल्यावरच का, याचे उत्तर त्यांनीच द्यावे, असे म्हटले होते. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आरक्षणाचा लढा हा 1980 पासून सुरू आहे, त्यासाठीच अण्णासाहेब पाटील यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. त्यानंतर, 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी का मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. गेल्या 32 वर्षांच्या लढाईत मराठा समाजाला मी पहिल्यांदा आरक्षण दिले आहे. सारथीची निर्मित्ती आम्ही केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आम्हीच सुरू केले , आता नरेंद्र पाटील हे या महामंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे, मराठा समाजासाठी यापूर्वीच्या किंवा महाविकास आघाडीतील नेत्यांनी काय केले ? मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी काय केले ? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमातून विचारला होता. देवेंद्र फडणवीसांच्या या प्रतिक्रियेकवर आता मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली असून पुन्हा एकदा फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
मी बार बार त्यांना बोलतो म्हणजे ते माझे विरोधक शत्रू नाहीत,14 महिने आम्ही फडणवीस यांना सांगितलं होतं की तुम्ही निर्णय घ्या, तुमचं नाव घेतो म्हणजे तुमच्यासारखा विश्वासघातकी या इतिहासात कधी घडला नाही, या भूमीवर देखील कधी आला नसेल इतका विश्वासघाती, असे म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. तुम्हीच वाटोळं केलं, म्हणून तुमचंच नाव घेणार ओबीसींच्या जाती घालता आणि मराठ्यांना आरक्षण देत नाही. पंधराशे पंधराशे मतदानाच्या नावाखाली लोकांना वाटतात आणि बंद ही करतात, लोकांना कर्जमाफी करत नाहीत, शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढवत नाहीत, अंगणवाडी सेविका शिक्षकांचा प्रश्न तसाच पडलेला आहे, तुम्ही प्रश्न सोडतात तरी कोणते?, असा सवाही मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून केला आहे.