यमाई देवीच्या कृपेने मी भारताचा सरन्यायाधीश झालो , राम मंदिराचा प्रश्नही देवानेच सोडवला : सरन्यायाधीश थनंजय चंद्रचूड

पुणे : सरन्यायाधीश थनंजय चंद्रचूड यांनी आज पुण्यात आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, “पूर्वजांच्या पुण्याईमुळे मी इथवरचा प्रवास करू शकलो आणि यमाई देवीच्या कृपेने मी भारताचा सरन्यायाधीश झालो. न्यायालयात काम करत असताना कित्येक वेळा अशी प्रकरणं समोर येतात जी सोडवणं अवघड असतं. माझी अशीच काहीशी स्थिती अयोध्या प्रकरणाचा निकाल देताना झाली होती. आयोध्या खटला माझ्यापुढे चालू होता. तीन महिने आम्ही त्यावरील सुनावणी करत होतो. शेकडो वर्षे जो वाद कोणी सोडवू शकलं नव्हतं, तेच प्रकरण आमच्या पुढे येऊन ठेपलं होतं. त्यावेळी यातून मार्ग कसा शोधायचा? असा प्रश्न आम्हाला पडला होता. मी या खटल्याचा निकाल देण्यापूर्वी देवाची पूजा करताना देवाकडेच मदत मागितली होती”.
देशात तीन दशकांपासून चालत अलेला राम जन्मभूमीबाबतचा खटला पाच वर्षांपूर्वी सोडवण्यात सर्वोच्च न्यायालयाला यश मिळालं. सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल दिला होता. ज्यानंतर अयोध्येतील वादग्रस्त जागेवर मंदिर निर्मितीचा मार्ग मोकळा झाला. न्यायालयाच्या निकालानंतर श्री रामजन्मभूमी ट्रस्टने त्या जागेवर आता मंदिर उभारलं असून या वर्षी जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराचं लोकार्पण केलं. न्यायमूर्ती रंजन गोगोई, शरद अरविंद बोबडे, धनंजय यशवंत चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नजीर या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने याप्रकरणी निकाल दिला होता. यापैकी धनंजय चंद्रचूड हे आता भारताचे सरन्यायाधीश आहेत. चंद्रचूड यांनी नुकतंच राम जन्मभूमीबाबतच्या खटल्यावर भाष्य केलं आहे.
अन् देवाने मला मार्ग दाखवला : धनंजय चंद्रचूड
सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “मी दररोज सकाळी देवाची पूजा करतो तशीच पूजा त्या दिवशी देखील करत होतो. मी भगवंतापुढे बसलो आणि भगवंताला म्हणालो, आता तुम्हीच मला मार्ग शोधून द्या. तुमचा यावर विश्वास असेल, तुमची आस्था असेल तर देव तुम्हाला मार्ग शोधून देतात, देवाने मलाही मार्ग दाखवला”.
चंद्रचूड म्हणाले, “मी देशभर सर्वत्र फिरलोय, अनेक ठिकाणी गेलो आहे, तिथली मंदिरं पाहिली आहेत. परंतु, कन्हेरसरचं यमाई देवीचे मंदिर मला खूप आवडतं. इतकं सुंदर मंदिर मी देशात कुठेही पाहिलेलं नाही. येथील लोकांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे”.