Akshay Shinde Encounter Case : सगळेच संशयास्पद , संस्थचालक अद्याप फरार , पोलीस घेताहेत शोध , विरोधकांकडून चौकशीची मागणी ….

मुंबई : बदलापूरच्या एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. ऑगस्ट महिन्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती , त्याचा आज एन्काऊंटर झाला आहे. पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी त्याचा एन्काऊंटर केल्याची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली आहे. विरोधकांनी मात्र यावर संशय व्यक्त करून या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे .त्यामुळे हे प्रकरण आता पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. कारण विरोधकांनी या एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित केले असून या प्रकरणातील संस्थाचालक आणि इतर आरोपींना वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेचा आवाज बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतो आहे.
दरम्यान ज्या शाळेत हे प्रकरण घडले त्या संस्थेचा संस्थापक तुषार आपटे यांचे भाजपाशी संबंध असून तो अजूनही फरार आहे. त्याचा पोलिसांना अद्याप त्याचा कोणताही पत्ता लागला नाही. त्यामुळे अद्याप त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेच्या संस्थाचालकाला पोलिस वाचवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
यावर पीडितेच्या वकिलांनी आपली प्रतिक्रिया देताना त्याला शिक्षा अपेक्षित होती परंतु जे घडले ते अपेक्षित नव्हते असे म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यात बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली. त्यानंतर त्या शाळेतील सफाई कामगार असलेल्या अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याची माहिती असतानाच आता मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला आहे. अक्षय शिंदेकडे या प्रकरणासंबंधी सर्वकाही माहिती होती. पण त्याच्या एन्काऊंटरनंतर अजून कोण-कोण या प्रकरणात गुंतलं होतं याची माहिती आता कधीच समोर येणार नाही असे विरोधकांनी म्हटले आहे.
तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ
बदलापूरमधील ज्या मुलींवर अत्याचार करण्यात आला त्यांच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली. पण संबंधित शाळेचे नाव ऐकून पोलिसांनी ही तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले. तक्रारदार पालकांना तब्बल 10 तास ताटकळत ठेवण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या दबावानंतर ही तक्रार घेण्यात आली. नंतर या प्रकरणाची तक्रार न घेणाऱ्या महिला पोलिस निरीक्षकाची बदली करण्यात आली.
शाळेतील 15 दिवसांचे सीसीटीव्ही गायब
बदलापूर प्रकरणाचा तपास करताना या शाळेतील सीसीटीव्ही तपासण्यात आले. पण ही घटना ज्यावेळी घडली त्या दरम्यानचे 15 दिवसांचे सीसीटीव्ही गायब असल्याचे समोर आले. स्वतः शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांनीच माध्यमांना ही माहिती दिली. पोलिसांनीही या प्रकरणी तपास करताना गायब झालेल्या सीसीटीव्हीचा मुद्दा जास्त ताणला नाही. त्यांच्यावर कोणता दबाव होता की जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आलं हे अद्याप समोर आले नाही.
संस्थाचालक फरार, कोणतीही कारवाई नाही….
बदलापूरमधील ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा भाजपच्या पदाधिकाऱ्याशी संबंधित असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यामुळे या शाळेचे नावही गुपित ठेवण्याचा प्रयत्न केला. ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेच्या प्रशासनावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही हे विशेष. ही शाळा नेमकी कुणाची आणि कोण चालवतंय याचीही माहिती समोर येऊ दिली नाही. त्यामुळे शाळेबद्दल असलेली माहिती दडपण्याचा प्रयत्न केला गेला का असा प्रश्न उपस्थित होतोय.
एकंदरीत, मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करून या अत्याचार प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुषमा अंधारे, विजय वडेट्टीवार , जयंत पाटील आणि इतर विरोधी पक्षांनी केला.
दरम्यान या प्रकरणात आणखी किती चिमुकल्या मुलींचे शोषण झाले आहे याचा आता शोध घेतला जाणार का? शाळेवर आणि संस्थाचालकांवर कारवाई होणार का? या प्रकरणात अजून कोण-कोण गुंतलं आहे याचं उत्तर मिळणार का? अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर आता बदलापूर अत्याचार प्रकरणातील ‘गुपित’ही त्याच्यासोबत जाणार का? असे प्रश्न माध्यमांनी उपस्थित केले आहेत.
बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 23, 2024
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया ….
दरम्यान, या प्रकरणी शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की , ”बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे.”, असे शरद पवार यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
“बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी गुन्हेगार अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्याच्या तपासासाठी आणत असताना त्याने पोलिसांची बंदूक खेचून पोलिसांवर फायरिंग केली. त्यात एपीआय निलेश मोरे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ बचावासाठी गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. आता पोलिस तपासात वस्तुस्थिती डिटेलमध्ये समजून येईल”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. तसेच, ज्यावेळी या लहान मुलीवर अन्याय झाला, त्यावेळी विरोधक सांगत होते याला फाशी द्या, आता तिचं विरोधक आरोपीची बाजू घेत आहे. ज्याने माणुसकीला काळिमा फासणारी कृत्य केले, अश्या आरोपीची बाजू घेणे म्हणजे निंदाजनक आहे. त्याचा निषेध करावा, असे म्हणत विरोधकांच्या टीकेवर पलटवार केला.