मोठी बातमी : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या , पोलिसांची बंदूक हिसकावून घेत स्वतःवर झाडली गोळी !!

स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी अक्षयवर गोळीबार केला : मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री
स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी अक्षयवर गोळीबार केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरत असल्याने ते या प्रकरणात आरोप करीत आहेत असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. दरम्यान पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणार्थ आरोपीवर गोळीबार केला या प्रकरणात पोलिसही जखमी आहेत. असेही मुख्यमंत्री म्हणाले. तर आरोपीच्या पत्नीने लैंगिक छळाचा आरोप केल्यामुळे अधिक तपास करण्यासाठी पोलीस त्याला कोर्टात घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांची बंदूक हिस्कावाल्याने स्व संरक्षणासाठी पोलिसांनी एन्काऊंटर केल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ठाणे : अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर ज्या घटनेवर संताप व्यक्त करण्यात येत होता त्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या माहितीनुसार आरोपीने पोलिसांच्या बंदुकीने गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर आली आहे. ताज्या माहितीनुसार त्याचामृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. दरम्यान सुधारित माहितीनुसार आरोपीने बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला असता, एन्काउंटर मध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस आरोपीला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना त्याने पोलीसांची बंदूक हिसकावून स्वत:वर गोळी झाडली आहे. पोलिसांच्या बंदुकीने गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला आहे. या वेळी अक्षयला वाचवण्यासाठी गेलेले पोलीस अधिकारी देखील जखमी झाले आहे. अक्षयची प्रकृती गंभीर आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु त्याचा मृत्यू झाला आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
आणखी काही माहिती ….
याबाबत गुप्तता पाळली जात असताना , एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, माहितीनुसार अक्षय शिंदेने स्वत:वर गोळी झाडली नसून अक्षयचा एन्काऊंटर झाला आहे. अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळी झाडली. त्याने दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलीसांनी स्वसंरक्षणासाठी बंदूक चालवली आहे.
तळोजा जेलमधील सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रान्चला घेऊन जात होते, त्यावेळी हा प्रकार घडला. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांना लागली गोळी लागली आहे. साधारण 6.30 च्या आसपास पोलीसांची टीम मुंब्रा बायपास जवळ आली. तेव्हा आरोपीने एका कॉन्स्टेबलच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार केला. पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर झालेल्या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली. यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला. अक्षयच्या चेहऱ्यावर गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे.
अक्षय शिंदे याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्याच्याविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात यावा अशी विनंती करण्यात आली होती. अक्षय शिंदे याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अक्षय शिंदे याच्याविरोधात पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा केले आहेत. अक्षयविरोधात पोलिसांना एक भक्कम साक्षीदार सापडला असून त्या साक्षीदाराची साक्ष ही अक्षयला कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी मदत करणारी ठरणार आहे.
अनेकांच्या घटनेवर प्रतिक्रिया …
या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली असून राजकीय नेतेही या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेवर भाष्य करताना पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दुसरीकडे बदलापूर अत्याचार प्रकरणातील सरकारचे वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया देताना, याची न्यायालयीन चौकशी होईल, असे म्हटले आहे.
बदलापूर आरोपीवरील गोळीबारप्रकरणी घटनेची न्यायालयीन चौकशी होईल, त्यासंदर्भात आज काहीही बोलणं योग्य होणार नाही. याबाबत मला अधिकृत माहिती आज नाही, माझं कुठल्याही अधिकाऱ्यासोबत बोलणं झालं नाही, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले. तसेच, आत्तापर्यंतच्या तपासात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानुसार, आरोपी विरुद्ध भरपूर पुरावे एसआयटीला उपलब्ध झाले होते. आरोपीला देखील आरोपपत्राची कॉपी मिळाली होती. माझ्या अनुभवानुसार काही आरोपींना आपल्या गुन्ह्याचा पश्चाताप होत असतो, त्यातून त्याने हे पाऊल उचललं असावं, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले. तसेच, याप्रकरणाची न्यायालयाीन चौकशी होईल, त्यानंतर सर्वकाही समोर येईल असेही निकम यांनी सांगितले.
विजय वडेट्टीवार म्हणाले की ,
यावर आपली प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की , या सर्व संशयास्पद प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. ज्या शाळेत हे सर्व प्रकरण घडले ती शाळा सत्ताधारी भाजपच्या लोकांशी संबंधित आहे त्यामुळे पुरावे नष्ट करण्याच्या इराद्याने ही घटना घडली आहे का ? याची चौकशी होणे गरजेचे आहे.
दरम्यान हे एन्काऊंटर बोगस असून या प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी हे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच राज्याचे गृहमंत्र्यांनी कुणाला वाचवण्यासाठी पोलिसांना हे आदेश दिले असा सवालही त्यांनी विचारला.
अक्षय शिंदे याला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना ही घटना घडली. अक्षय शिंदेंने पोलिसांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्या झटापटीत पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या. या प्रकरणावर पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला. गृहमंत्र्यांनी कोणत्या संस्थाचालकाला वाचवण्यासाठी, इतर कोणत्या आरोपींना वाचवण्यासाठी त्याचा आवाज बंद केला असा सवाल त्यांनी विचारला.
संस्थाचालकांना वाचवण्याचा प्रयत्न?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आज जी गोष्ट झाली त्यावरून राज्यातमध्ये काही कायदा सुव्यवस्था राहिली आहे की नाही असा प्रश्न पडतोय. अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर झाल्यानंतर या प्रकरणात कोण संस्थाचालक आणि आरोपी होते हे कधीही बाहेर येणार नाही. बदलापूर प्रकरणी राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा परिस्थितीमध्ये या घटनेची सखोल चौकशी करण्याऐवजी आरोपीला मारून टाकले जाते. गृहमंत्र्यांचे काही वचक आहे की नाही? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला.
आई वडिलांनी दिलेली माहिती ….
या घटनेबाबत एनडीटीव्ही शी बोलताना आरोपीच्या आई वडिलांनी आमच्या मुलाची पोलिसांनी हत्या केल्याचा आरोप केला आहे. आज सकाळी आम्ही अक्षयला भेटण्यासाठी गेलो होतो तेंव्हा त्याला कोर्टात नेण्याची कोणतीही माहिती आपल्याला नव्हती. दुपारी आम्ही त्याला भेटलो तेंव्हा त्याच्या खिशात काही तरी चिट्ठी असल्याचे तो आम्हाला सांगत होता परंतु आम्हाला काही ती चिट्ठी मिळाली नाही आणि आता ही बातमी आली आहे. त्याला कुठल्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे ? याची विचारणा अक्षयच्या आई वडिलांनी एनडीटीव्ही च्या अँकरला केली. त्यांना याबद्दल काहीही माहिती नव्हती.
शाळेची चौकशी थांबविण्यासाठी अक्षय शिंदेला यमसदनी धाडले? जयंत पाटलांचे खळबळजनक वक्तव्य
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, बदलापूर आरोपीने स्वतःला गोळी मारून घेत आत्महत्या केली. मात्र यात शाळेची पुढील चौकशी थांबविण्यासाठी हे केलेले असावे, यात बाकीचे वाचतील म्हणून यालाच यमसदनी पाठवले असावे अशी शंका वाटते, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे.
दोन्ही हातात बेड्या ठोकलेला माणूस बंदूक काढून घेतो?
अक्षयने पहिल्यांदा स्वत:ला गोळी मारल्याचे समोर आले होते, पण पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ मारल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अक्षय शिंदेंचा आवाज जागच्या जागी बंद केला का? अशी विचारणा करत प्रकरण दडपण्यासाठी हत्या केली की एन्काउंटर अशी विचारणा केली आहे. यांनी या प्रकाराची सीबीआय चौकशीची मागणी नार्को टेस्ट सुद्धा करण्याची मागणी केली आहे.
सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, मला एन्काउंटर झाल्याची माहिती मिळाली. या प्रकरणात पोलिसांनी स्वसंरक्षणाचा बनाव केल्याचा दिसतो. हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. अक्षय शिंदे हिंस्त्र होता का? त्याची पार्श्वभूमी तशी होती का? जर होती, तर वेगळी काळजी का घेतली नाही? दोन्ही हातात बेड्या ठोकलेला माणूस बंदूक काढून घेतो यावर कोण विश्वास ठेवणार? अशी विचारणा त्यांनी केली.
प्रकरण दडपण्यासाठी हत्या केली की एन्काउंटर केला?
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, या प्रकरणातील संस्थाचालक आपटे अजूनही फरार का आहे? हे प्रकरण जागच्या जागी दाबण्यासाठी हा प्रकार झाला आहे का? अक्षय शिंदेचा आवाज जागच्या जागी बंद केला का? प्रकरण दडपण्यासाठी हत्या केली की एन्काउंटर केला? या प्रकरणातील पोलिस निलंबित झाले पाहिजेत. संबंधितांची सीबीआय चौकशी करून नार्को टेस्ट झाली पाहिजे. पहिल्यापासून या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली आहे.