Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आज दिवसभरात : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना , सत्ताधारी विरोधकांना भिडले , पोलीसही हतबल ….

Spread the love

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरू असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. यातच आज मालवण येथील राजकोट किल्ल्यावर तब्बल दोन तास शिवसेना ठाकरे गट आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये राडा झाल्याचे  पाहायला मिळाले. आज दिवसभर किल्ल्याच्या पायथ्याशी हा गोंधळ चालू होता. यावेळी पोलिसांनी एकमेकांच्या अंगावर धाऊन जाणाऱ्या  दोन्ही गटाला अवरण्यासाठी सौम्य लाठीमारही केला परंतु यावेळी स्वतः भाजपचे खासदार नारायण राणे , नीलेश राणे आपल्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दमदाटी करीत विरोधकांना धमक्याही दिल्या परंतु पोलिस शांत राहिले. भाजप नेत्याची ही दादागिरी महाराष्ट्रातील जनता लाईव पाहत होती परंतु त्याचा कुठलाही परिणाम त्यांच्यावर दिसला नाही. 

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आज पाहणी करण्यासाठी पोहोचले, त्याच्या काही मिनिटे आधीच खासदार नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र, माजी खासदार निलेश राणेही दाखल झाले होते. त्यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. राजकोट किल्ल्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेवरून निर्माण झालेला असंतोष लक्षात घेता ,  जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे  स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संबंधितांवर कडक करवाई करण्यात येणार असल्याचे  सांगितले . तसेच “राज्यातील १३ कोटी जनतेची मी माफी मागतो”, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. ते आज एका कार्यक्रमात बोलत होते.

अजित पवार काय म्हणाले?

“दोन तीन दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा वाऱ्यामुळे कोसळला. मात्र, यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्या सर्वांच्या चौकशा केल्या जातील. आता काही बातम्या येत आहेत की हे त्यांनी केलं किंवा यांनी केलं. आता कोणी काय केलं? याचा सर्व तपास लागला पाहिजे. यामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो. मी याबाबत महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वाचे दैवत आहेत. मात्र, त्यांचा पुतळा अशा प्रकारे कोसळणे हे सर्वांना धक्का बसणारे आहे. यामध्ये जे कोणी दोषी असतील मग ते कोणीही असूद्या. वरिष्ठ अधिकारी असुद्या किंवा कंत्राटदार असुद्या. त्या कंत्राटदाराला तर काळ्या यादीत टाकले  पाहिजे”, असे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, “मालवणच्या घटनेवर कुणीच राजकारण करू नये, ही माझी विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दुःखद घटना आहे. अशा घटनांची योग्य चौकशी करून कोण दोषी आहेत, हे समोर आले पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याठिकाणी पुन्हा भव्य असा पुतळा उभारला गेला पाहिजे. आम्ही या तीनही गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं आहे. नौदलाने ही बाब गांभीर्याने घेतली असून चौकशी समिती तयार केली आहे. या समितीने पुतळ्याच्या ठिकाणी पाहणी केली आहे. नौदल यावर उचित कारवाई करेल. जे दोषी असतील त्यांच्याविरोधात कारवाई होईल.”

समुद्रकिनारी नजीक असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. घटनेमुळे राज्यातील शिवप्रेमींच्या प्रचंड रोषाला सरकारला जावे लागत आहे. अशातच आता केंद्रात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वातावरण तापलेले आहे. साधारण आठ महिन्यापूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी पुतळ्याचे अनावरण केले होते. आठ महिन्यातच पुतळा पडल्याने प्रियंका गांधी यांनी थेट मोदींना भष्ट्राचारी म्हणत हल्लाबोल चढवला आहे. इतकेच नव्हे तर मोदींनी केलेल्या कामाचा आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी केलेल्या कामाचा थेट पाढाच प्रियंका गांधी यांनी वाचला आहे.

प्रियंका गांधी यांचे  ट्वीट….

पंतप्रधानांनी मागील वर्षीच सिंधुदुर्गात जात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. पण फक्त आठ महिन्यात पुतळा कोसळला आहे. अयोध्येचे मंदिर, उज्जैन महाकालमधील सप्तर्षींच्या मुर्ती, नवे संसदभवन, हायवे, पूल, रस्ते, मोठे बोगदे जे काही सरकारकडून बनवले जात आहे त्यामध्ये काही ना काही दोष आढळून येत आहे. पंडित नेहरु यांच्यावेळी सुद्धा भाकरा नांगल सारखी धरण उभारण्यात आली. हीराकुंड सारखे बांध उभारले गेले. IIT, IIM, AIIMS सारखी शैक्षणिक संस्थाने उभारण्यात आली. सर्वच्या सर्व अजूनही नीट आहेत आणि देशाच्या विकासात योगदान देत आहेत. पण भाजपने श्रद्धेच्या, महापुरुषांचा आणि देशाच्या नावावर भ्रष्टाचार केला त्याचे उत्तर द्यावे लागेल अशी भूमिका प्रियंका गांधी यांनी मांडली आहे.

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला. या घटनेवरुन आरोप प्रत्यारोप होत आहेत. नौदल दिनाच्या निमित्ताने हा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र हा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला आहे.

काय घडली घटना?

मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी यावरून राज्य सरकारला धारेवर धरले आहे. या पुतळ्याची   उभारणी नौदलामार्फत करण्यात आल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले असले तरी, विरोधी पक्षांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर या दुर्घटनेचे खापर फोडले आहे. या घटनेस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली तर, रवींद्र चव्हाण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी खासदार विनायक राऊत यांनी केली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उबाठा, काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांनीही राज्य सरकारवर टीका केली. या घटनेनंतर आता चर्चा होते आहे की पुतळा साकारणारा जयदीप आपटे कोण आहे?

कोण आहे शिल्पकार जयदीप आपटे?

जयदीप आपटे २५ वर्षे वयाचा तरुण शिल्पकार आहे. जो मूळचा कल्याण येथील रहिवासी आहे. जयदीप आपटेकडे २८ फुटांचा ब्राँझचा पुतळा उभारण्याची जबाबदारी नौदलाने सोपवली होती. जयदीप आपटेने जून ते डिसेंबर अशा सात महिन्यांच्या कालावधीत हा पुतळा पूर्ण केला. जयदीप आपटेने या पुतळ्याबाबत एक भीतीही व्यक्त केली होती.

पुतळ्याच्या कामासंदर्भात समजले  तेव्हा मला वाटले की संधी मोठी आहे. पण त्याचवेळी मनात हा विचार आला होता की सगळं नीट पार पडलं तर आपलं नाव होईल पण एक जरी चूक झाली तर सगळं संपेल. ‘सनातन प्रभात’ला दिलेल्या मुलाखतीत जयदीप आपटेने हे म्हटलं होतं.

दरम्यान पुतळ्याचे  काम सुरु केल्यानंतर मला अडचणी आल्या असेही जयदीप आपटेने सांगितले  होते . खरे तर पुतळा जोडून जागेवर नेला जातो, पण पुतळा बसवण्याच्या जागेपर्यंतचे मार्ग लहान होते. त्यामुळे हातात असलेला वेळ कमी असल्याने पुतळ्याचे तुकडे २७ ऑक्टोबरपासून जोडण्यास सुरुवात केली. मला छत्रपती शिवरायांनीच उर्जा दिली असेही तेव्हा जयदीप आपटेने म्हटले  होते. आता जयदीप आपटेला नौदलाने जे काम दिले  होते  ते का दिले ? कुणाच्या सांगण्यावरुन दिले ? हे प्रश्न उपस्थित होत आहेत.

शरद पवार काय म्हणालेत?

पुतळ्याची जबाबदारी ही पूर्णपणे राज्य सरकारची असल्याच शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. ‘ते नाकारू शकतं नाही. पुतळ्याच्या उद्घाटनासाठी प्रामुख्यानं राज्य सरकारचे प्रतिनिधी तसंच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्या ठिकाणी होते. त्यामुळे जबाबदारी राज्य सरकारचीच आहे,’ असे त्यांनी ठामपणे सांगितलं.

त्यांनी पुढे शिवाजी महाराज यांचं उदाहरण देत म्हणाले, ‘एका महिलेला त्रास दिला म्हणून त्यावेळी शिवाजी महाराज यांनी त्याचे हात कलम करण्याचे आदेश दिले होते. आम्ही कुठल्याही प्रकारचे राजकरण करतं नाही पण कुणी सांगत आहे की वाऱ्याचा वेग जास्त होता त्यामुळें पुतळा पडला. मग ज्या ठिकाणी पंतप्रधान गेले तिथं किती मोठया प्रमाणात भ्रष्टाचार खोलवर पोहोचलाय हे पाहिला मिळालंय. या सरकारबद्दल जनतेच्या मनात चीड निर्माण झाली आहे.’

तर महायुती सरकार कमीशनखोर आहे. जेव्हा पुतळ्याचा अनावरण केलं जात होतं त्यावेळी प्रोसिजर फॉलो केली गेली नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री म्हणताय मी यापेक्षा मोठा पुतळा करू, अरे पण तुम्ही जे पाप केलं त्याचा काय? महाराष्ट्रमध्ये महिला सुरक्षित नाही. रश्मी शुक्ला राजकारण करत आहे . Rss चा अजेंडा चालवत आहे, अशी सडेतोड टीका नाना पटोले यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!