MaharashtraPoliticalNewsUpdate : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांची छगन भुजबळ यांना साद ….

नाशिक : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज नाशिक दौऱ्यावर आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ आणि माजी आमदार जे पी गावित यांना मोठी राजकीय ऑफर दिली. दरम्यान पेसा अंतर्गत नोकर भरती केली जावी, या मागणीसाठी माकपचे माजी आमदार जे पी गावित तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यातच नाशिक दौऱ्यावर आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी माजी आमदार जे पी गावीत यांची भेट घेतली. नाशिकमध्ये आंदोलन न करता थेट मुख्यमंत्री कार्यालयावर लक्ष करावे, असा सल्लाही आंबेडकरांनी गावितांना दिला.
यावेळी जे पी गावितांना चर्चा करतानाच राजकारणात आमच्या सोबत, तिसऱ्या आघडीसोबत या अशी थेट ऑफर आंबेडकर यांनी गावीत यांना दिली. त्यामुळे जे पी गावीत यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आंबेडकर यांच्या ऑफरचीच चर्चा आंदोलन स्थळी झाली. यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी जे पी गावीत यांच्या बाबतीत मिश्किल टिपणी देखील केली. त्यांचं लग्न आधीच काँग्रेस सोबत झालं आहे. आता त्यांचा काडीमोड होत नाही, तोपर्यंत काही नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली. कोणासोबत जायचा हा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे सांगत आंबेडकर यांच्या ऑफरवर गावित यांनी फारसे भाष्य करणे टाळले.
प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मोठी ऑफर दिली आहे. छगन भुजबळ हेच १०० टक्के ओबीसी नेते आहेत. त्यांच्या पक्षात ओबीसींवर बोलले जाते का? याबाबत त्यांनी सांगावं, असे म्हणत छगन भुजबळ यांनी आमच्या सोबत यावं, त्यांना मी खुली ऑफर देत आहे, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आता प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंवर टीका
प्रकाश आंबेडकर यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात पण लाठीचार्ज झाला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात पण लाठीचार्ज होत आहे. ठाकरे यांनी कोणाकडे बोटं करू नये. इतरांवर एक बोट करत असताना आपल्याकडे चार बोटं असतात, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. मात्र हा पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे. याबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हे सरकार भ्रष्टाचाराचे माहेर घर आहे. रस्ते, उड्डाण पूल यात मोठे भ्रष्टाचार झाले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी सरकारवर केला आहे.