MaharashtraNewsUpdate : आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधानांनी लोकार्पण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धाराशाही पडल्याने राज्यात सर्वत्र संताप ,

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये असंतोषाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी पुतळ्याचे काम चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे तो पुतळा कोसळला असा आरोप करीत सार्वजनिक विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली तर अनेकांनी याबद्दल आपल्या तीव्र भवन व्यक्त करीत सरकारवर दर्जाहीन कामकाजाचा आरोप केला आहे.
आज दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पुतळा कोसळला असल्याची माहिती मिळत आहे. याच घटनेवरुन आता आरोप प्रत्यारोपाचा फैरा सुरु झाला आहे. ४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता.या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षक ठरला होता. यावर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे . विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि या पुतळ्याचे अनावरण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन हा पुतळा कशामुळे पडला याचे कारण सांगितले . तसेच हा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर भारतीय नौदलाने उभारला होता असे सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत : मुख्यमंत्री
याबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि त्यांचा पुतळा ही आमची अस्मिता आहे. तो पुतळा भारतीय नौदलाने उभारला होता. पुतळ्याचं डिझाईन देखील नौदलानेच तयार केलं होतं. हा पुतळा कोसळल्याचं वृत्त समजल्यावर मी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितलं की ही घटना घडली त्यावेळेला त्या भागात ४५ किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता, त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं”.
“मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की उद्या तिथे (घटनास्थळी) नौदलाचे अधिकारी जाणार आहेत. तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे घटनास्थळी पोहोचले आहेत. तिकडे जाण्यापूर्वी मी त्यांना काही सूचना केल्या आहेत. उद्या नौदलाचे अधिकारी व आमचे अधिकारी स्मारकाची पाहणी करतील. उद्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पुन्हा उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाईल. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आपल्या महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात आणि मजबुतीने उभा राहिलेला तुम्हाला दिसेल” असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आठ महिन्यांपूर्वी झाले होते लोकार्पण
आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनाचं (४ डिसेंब २०२३) औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र हा पुतळा कोसळला असून राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका होऊ लागली आहे. महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सुरुवातीपासून या कार्यक्रमावर व स्मारकाच्या कामावर आक्षेप घेत चौकशीची मागणी केली होती. आता पुतळा कोसळल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, विरोधी पक्ष यावरून सरकारवर टीका करत असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज (कोल्हापूर संस्थान) व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. तसेच संभाजीराजे म्हणाले, “हा पुतळा खूप घाईगडबडीत उभा केला होता. तसेच हा पुतळा आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून बनवला नव्हता. त्यामुळे आम्ही हा पुतळा बदलण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केलं”. संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारला यासंदर्भात पत्र पाठवलं होतं. या पत्राचा फोटो देखील संभाजीराजे यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.
“राजांचा पुतळा नव्हे, महाराष्ट्रधर्म पडला!” शरद पवार गटाची टीका
या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षानेही राज्य सरकार व थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. राष्ट्रवादीने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, आपल्या प्रसिद्धीच्या दिखाव्यासाठी वेळ आणि कामाच्या दर्जाला दुय्यम स्थान देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नीतीचा राम मंदिर आणि संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेलाचं फटका! नौदल दिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला !
सगळ्यांना जेलमध्ये टाका सोडू नका : मनोज जरांगे
स्मारकाचे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कोणीतरी नेताच असणार, कशातही पैसै खायची सवय लागली यांना, सगळ्यांना जेलमध्ये टाका सोडू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर दिली. हे लोक चांगले काम करत नाहीत. यांना पुतळे कळत नाही, दैवत कळत नाही, छत्रपती शिवराय देशाचे दैवत, ते हिंदू धर्माची अस्मिता आहेत, असे म्हणत जरांगे यांनी आता मोदी साहेबांनी छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमिपूजन केल होत हे विसरून जाऊ नका, ध्यानात ठेवा, असा टोलाही लगावला.
जरांगे पुढे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करतात. यांना कशात खाव हे सुद्धा कळत नाही. कोण कॉन्ट्रॅक्टर, कोणी उद्घाटन केलं, मोदी साहेबांना उद्घाटन केल म्हणतात. ते इतक्या अडचणीत कुठे गेलते. इतक्या लांब आता त्यांना दोष देऊन उपयोग नाही. उद्घाटकाचा काय दोष आहे, काम करणारेच नीट नसले तर ते काय करणार, असे म्हणत जरांगे यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांना सुनावले. परंतू हे असले लोक ज्यांना छत्रपती शिवरायांचा पुतळा कळत नाही त्यांना सोडलेच नाही पाहिजे. यांना एकदाच अद्दल घडायला पाहिजे, अशी मागणी जरांगे यांनी केली.
पुतळे, स्मारकावरून राजकारण्यांना खडेबोल
पुतळ्याची देखरेख करण गरजेच आहे. नुसता पुतळा उभा केला की प्रशासन ही मोकळ होत. प्रत्येक ठिकाणी असेच आहे. निवडणुका झाल्यानंतर छत्रपती शिवरायांचे सरकार येण्यासाठी आशीर्वाद घेतलेला आहे. आता नुसते उद्घाटन उद्घाटन निवडणुका निवडणुका सुरू आहे. दैवताचे अपमान करू नका. छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक, इंदू मिलचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासंदर्भात फक्त निवडणुका आल्यावर बोलायचं, हे बंद करा आता, असे खडेबोल जरांगे यांनी राजकारण्यांना सुनावले.
कॉन्ट्रॅक्ट ठाण्यातील व्यक्तीला देण्या आलं होतं….
दरम्यान . हा पुतळा नेमका कोणी उभारला, कोणाला टेंडर देण्यात आलं, पुतळ्याचा दर्जा कसा होता, पुतळ्याचा नीट अभ्यास केला होता का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच, ह्या पुतळा उभारणीचं कॉन्ट्रॅक्ट ठाण्यातील व्यक्तीला देण्या आलं होतं, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन शेअर केली आहे. तर , ह्या पुतळ्याची माहिती देताना, हा पुतळा नौदलाने उभारला असून त्याच्या देखभालीचं कामही त्यांच्याकडे होते, असे सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.
केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळा उभारायचा हेच सरकारचे ध्येय होते. हे इव्हेंट सरकार आहे. त्यांना कामाच्या दर्जाचं घेणं देणं नाही. कमीशन घेणं आणि कंत्राट वाटणे एवढंच काम सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं. मात्र हा पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
जयंत पाटील म्हणाले की, ही घटना अत्यंत गंभीर आहे. महाराजांचा पुतळा बसवताना काळजी घेतली नाही. केवळ पंतप्रधान यांच्या हस्ते पुतळा उभारायचा हेच त्यांचे ध्येय होते. हे इव्हेंट सरकार आहे. त्यांना कामाच्या दर्जाचं घेणं देणं नाही. कमीशन घेणं आणि कंत्राट वाटणे एवढंच काम सुरू आहे. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत ही हेच झाले आहे. महाराजांचे नाव वापरायचे, पण काळजी घ्यायची नाही, असे त्यांनी म्हटले आहे.