MaharashtraRainUpdate : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस कुठे होणार मुसळधार पाऊस , हवामान खात्याने दिला इशारा ….

मुंबई : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानने दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,आज आणि उद्या मराठवाडा , विदर्भ , मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसाठी उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाआहे. त्यासोबतच ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील घाट परिसरासाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट परिसरात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच घाट परिसर सोडता शहरी भागातही हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता
दरम्यान IMD यांनी अहमदनगर, छ.संभाजीनगर,जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील 3 तासात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह व 40 ते50 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता वर्तविली आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातही उद्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगरासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भात देखील उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी
दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दरम्यान, सध्या राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. नदी नाले धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोमवार दिनांक 26 ते शुक्रवार 30 ऑगस्ट दरम्यानच्या पाच दिवसादरम्यान कमाल तापमान वाढीबरोबर महाराष्ट्रात पुन्हा उन्हाचा पारा चढण्याची शक्यता जाणवते
पुणे शहरात विकेंडला ऑरेंज अलर्ट
पुणे शहरासह घाटमाथ्यावर मान्सून सक्रिय झाला असून, शहरावर गेल्या तीन दिवसांपासून क्युम्युनोलिबस ढगांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे कमी काळात मोठा पाऊस होत असल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. शहराला 23 व 26 या दिवशी येलो, तर 24 व 25 रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट
पुणे, रायगड,ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, वाशीम, जालना, बीड, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.