Bangladesh Government Crisis LIVE : भारताच्याच मदतीने शेख हसीना भारतात पोहोचल्या सुखरूप , जेवणही विमानताच घेतले….
नवी दिल्ली : शेख हसीना सध्या भारतात आहेत. त्यांचे विमान हिंडन एअरबेसवर उतरले आहे. येथे NSA अजित डोवाल यांनी त्यांची भेट घेतली. सुमारे दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख एअर मार्शल पीएम सिन्हा यांनी शेख हसीना यांची भेट घेतली. आता असेही समोर आले आहे की, शेख हसीना भारतात येण्यापूर्वी राजधानी दिल्लीत मोठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत RAW प्रमुख, NSA आदी सहभागी झाले होते.
शेख हसीना यांच्या बांगलादेशातून भारतात पोहोचण्याच्या मोहिमेत परराष्ट्र मंत्रालय, एनएसए, लष्कर, हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे समोर आले आहे. सोमवारी दुपारी 12 वाजता अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, लष्करप्रमुख, रॉ प्रमुख, हवाई दल प्रमुख आणि इतर यंत्रणांच्या प्रमुखांमध्ये एक मोठी बैठक झाली. या बैठकीतच शेख हसीना यांच्या बांगलादेशातून बाहेर पडण्याची रणनीती आखण्यात आली होती. त्यानंतरच ती बांगलादेशचा राजीनामा देऊन भारतात आली.
शेख हसीना अद्याप हिंडन एअरबेसमध्ये असल्याचे समोर आले आहे. या दरम्यान त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. एनएसए अजित डोवाल यांच्याशी त्यांनी दीड तास चर्चा केल्याचेही वृत्त आहे. या काळात भारतात आश्रय देण्याबाबत काही चर्चा झाली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, नवीन अपडेटनुसार, वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख एअर मार्शल पीएम सिन्हा यांनी शेख हसीना यांची भेट घेतली आहे.
शेख हसीना अजूनही हिंडन सेफ हाऊसमध्ये, जेवणही तेथेच केले….
शेख हसीना अजूनही हिंडनमधील सेफ हाऊसमध्ये असून त्यांनी रात्रीचे जेवणही तेथेच घेतले . त्यांचे पुढील उड्डाणांचे काय नियोजन आहे, हे अद्याप ठरलेले नाही. त्या आणखी काही तास येथेच राहू शकतात असे सांगण्यात येत आहे. दरम्यान बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या निवासस्थानी सीसीएसची बैठक सुरू असून यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर , NSA अजित डोवाल यांचा सहभाग असल्याचे वृत्त आहे. या बैठकीत काय चर्चा होणार आहे, हे समोर आलेले नाही. बांगलादेशातील सध्याची परिस्थिती आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आश्रय देण्याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधींनी विचारले, शेख हसीना भारतात आल्या आहेत का?
दरम्यान सोमवारी लोकसभेचे कामकाज दुसऱ्या दिवशी तहकूब करण्यात आले तेव्हा राहुल गांधी आपल्या जागेवरून उठले आणि बांगलादेशमध्ये काय चालले आहे, सरकारची भूमिका, शेख हसीना भारतात आल्या आहेत काय ? अशी एस जयशंकर यांच्याकडे विचारणा केली . त्यावर आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, काही कळताच माहिती देण्यात येईल असे एस जयशंकर यांनी सांगितले.
मेघालयने बांगलादेशच्या सीमेवर रात्रीचा कर्फ्यू
बांगलादेशातील हिंसाचार आणि अशांततेचा परिणाम भारताच्या सीमावर्ती राज्यांमध्येही दिसून येत आहे. परिस्थिती पाहता मेघालयमध्ये रात्री कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मेघालयाचे उपमुख्यमंत्री प्रेस्टन टायन्साँग यांनी सोमवारी सांगितले की, राज्य सरकारने शेजारील देशात अशांततेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.