PrakashAmbedkarNewsUpdate : प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली आरक्षण बचाव यात्रेमागील भूमिका, उद्या चैत्यभूमीपासून प्रारंभ…

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा उद्या 25 जुलै ते 7 ऑगस्ट या काळात ही यात्रा चैत्यभूमीवरुन संपूर्ण राज्यभर काढण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षण बचाव यात्रेमागील भूमिका मांडली. यावेळी, गरीब व श्रीमंत मराठे अशा दोन गटांत त्यांनी मराठा समाजाचे वर्गीकरण करून मराठा – ओबीसी वाद वाढला आहे. हा तणाव कमी करण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे.
या पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले की , राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन दोन समाज आमने-सामने आले असून त्यावरून गावागावात आणि नेत्यांमध्येही जातीय तणाव पाहायला मिळत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन समाजात जातीय संघर्ष वाढत असल्याने राज्यात सलोखा निर्माण व्हावा आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी वंचित आरक्षण बचाव यात्रा काढली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
आंबेडकर पुढे म्हणाले की , एकंदरीत राजकीय पक्षांच्या भूमिका आपण पाहिल्यात तर महत्वाच्या विषयावर ते लक्ष देत नाहीत, हीच आताही परिस्थिती आहे. ओबीसी आणि मराठा एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. मात्र, अशावेळेस राजकीय पक्ष आणि नेत्यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. हे पक्ष जातींचे पक्ष आहेत, श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार पक्ष,काँग्रेस आणि अजित पवार यांचा पक्ष तर ब्राह्मण , कायस्थ प्रभू म्हणजे भाजप व शिवसेना उबाठा यांचा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही उद्यापासून आरक्षण बचाव यात्रा काढत आहोत. चैत्यभूमीवरुन ही यात्रा सुरु होईल, मग पुण्यात फुले वाडा, नंतर अनेक जिल्हे करत पुढे औरंगाबाद येथे 7 ऑगस्ट रोजी यात्रेची सांगता होईल, असे आंबेडकर यांनी सांगितले.
ओबीसींना आरक्षण जाण्याची भीती
दरम्यान राज्यात सध्या ओबीसी घाबरलेला आहे, लहान ओबीसी कार्यकर्त्यावर हल्ला होत आहेत. त्यामुळे शांतता प्रस्थापित व्हावी हाच उद्देश यात्रेमागे आहे. ही गंभीर परिस्थिती आहे, जरांगे पाटील थेट त्यांना आरक्षण द्या, नाहीतर आरक्षण रद्द करा म्हणत आहेत. तसेच, 225 निवडून आणणार असे नेते म्हणतात. आपले आरक्षण जाईल असे ओबीसींना वाटत आहे. त्यामुळे जिथे वाईट प्रकार झालाआहे, तिथे आळा घालण्याचे काम आम्ही करू, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
आम्ही निमंत्रित केले, पण कुणीही रिप्लाय दिला नाही…
दरम्यान, अनेक ओबीसी संघटना, नेते, शरद पवार यांनीही यात्रेत यावे , असे आम्ही आमंत्रण दिले आहे. पण, त्यांनी कोणीही काही रिप्लाय दिला नाही. दुर्दैवाने फटका बसेल म्हणून राजकीय नेत्यांनी काही भूमिका घेतली नाही. सामान्य माणसाला दिशा देणारे कोणीही नाही. आम्ही म्हणतोय मराठ्यांना आरक्षण देणे शक्य नाही. पण, हे राज्यकर्ते आहेत, खरी परिस्थिती न सांगता दिशाभूल करत आहेत, अशा शब्दात आंबेडकरांनी राजकीय नेत्यांना लक्ष्य केले. आता ओबीसी प्रमाणपत्र दिले आहेत, तेही आक्षेप घेण्यासारखे आहे. निवडणुकीत आम्ही ही भूमिका घेतोय, आम्हाला दोन्ही बाजूने फटका बसेल. पण ठिक आहे, आम्ही लोकांसाठी हे करतोय, असेही आंबेडकर यांनी म्हटले.