श्याम मानवांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी दिले हे उत्तर , मनोज जरांगेंच्या अटक वॉरंटमध्ये संबंध नाही…

मुंबई : काही सुपारीबाज तयार झाले असून ते सुपारी घेऊन आपल्यावर आरोप करतात, श्याम मानव हे त्यांच्या नादी लागलेत का हे पाहावे लागेल असे प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि इतर नेत्यांवर खोटे आरोप करावेत यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांवर दबाव आणल्याचा आरोप अनिसचे प्रमुख श्याम मानव यांनी केला होता. त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले.
अजित पवारांनी गुटखा व्यवसायिकांकडून कोट्यवधीची कमाई करून मागितली, उद्धव ठाकरेंनी 100 कोटी रुपयांची वसुली मागितली, आदित्य ठाकरेनी दिशा सॅलियनचा बलात्कार करून हत्या केली, अनिल परबांनी गैरववार केले असे चार अॅफिडेव्हिड द्या आणि ईडी प्रकरणातून सुटका करून घ्या अशी ऑफर अनिल देशमुखांना दिली होती असा दावा श्याम मानव यांनी केला होता. अनिल देशमुखांनी ते नाकारले आणि 13 महिने तुरुंगवास भोगला असा दावा श्याम मानव यांनी केला. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान अनिसचे प्रमुख श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, श्याम मानव मला इतके वर्षे ओळखतात, आरोप करण्यापूर्वी मला एकदा विचारायला हवे होते. अलिकडच्या काळात अनेक सुपारीबाज तयार झाले आहेत. सुपारी घेऊन आरोप करणे हे त्यांचे काम आहे. त्या सुपारीबाजांच्या नादाला श्याम मानव लागले का हे पाहावे लागेल.
मनोज जरांगे यांच्याविरोधात निघालेल्या अटक वॉरंटमध्ये राज्य सरकारचा काही संबंध नसल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगेंची केस आहे ती 2013 सालची आहे. या पूर्वीदेखील त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आले होते. पण ते हजर राहिल्यानंतर ते रद्द झाले. आता पुन्हा ते तारखेला गेले नाहीत, त्यामुळे त्यांच्याविरोधात वॉरंट निघाले. ते तारखेवर हजर राहिले तर वॉरंट रद्द होतात. आमच्यावरही असे अनेक वॉरंट निघाले आहेत. अटक वॉरंट निघाले आणि त्यावर कोर्टात हजर राहिले तर ते वॉरंट नंतर रद्द होते.
मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे गेल्या वेळी माझ्या आईवर बोलले होते. नंतर त्यांनी माफी मागितली. उपोषणामुळे त्यांना त्रास झाला होता, त्यामुळे तसे वक्तव्य झाले असे ते म्हणाले होते. आताही उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला असेल. त्यामुळे त्यांनी अशी वक्तव्य केली असतील.
श्याम मानव यांनी काय आरोप केले होते?
अजित पवारांनी पार्थ पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बोलावून गुटखा व्यवसायिकांकडून दर महिन्याला कोट्यवधींची कमाई करून द्यावी अशी मागणी केल्याचा जबाब तपास यंत्रणांकडे द्या. अनिल देशमुखानी तपास यंत्रणांपुढे चौकशीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजित पवार आणि पार्थ पवार यांचे नाव विविध खोट्या प्रकरणात घेतले तर ईडीच्या प्रकरणात सोडून देऊ अशी थेट ऑफर त्यांना देण्यात आल्याचा धक्कादायक दावा श्याम मानव यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांना ते गृहमंत्री असताना काही लोकांकडून सांगण्यात आले होते की तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून स्वतःची सोडवणूक करून घ्यायची असेल तर तुम्ही 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात उद्धव ठाकरे यांचं नाव घ्यावे. आदित्य ठाकरे यांचं नाव दिशा सॅलियन बलात्कार आणि हत्या प्रकरणात घ्यावे. अनिल परब यांचेही नाव त्यांच्याशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांच्या प्रकरणात घ्यावे. मात्र अनिल देशमुख यांनी तसं केलं नाही असे श्याम मानव म्हणाले.