निवडणूक विश्लेषण : विधान परिषदेत नेमके झाले काय ? काय सांगते मतांची आकडेवारी? महायुतीकडे अधिकची मते कुणाची ?

मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर फुटलेल्या मतांमुळे काँग्रेसची नाचक्की होत आहे . मात्र यावर अद्याप कुठल्याही नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे पक्षीय बलाबलानुसार भारतीय जनता पक्षाकडे स्वतःची १०३ मते होती. त्याबळावर भाजपाने पाच उमेदवार उभे केले होते. ठरल्याप्रमाणे त्यांच्या सर्व उमेदवारांना प्रत्येकी २६ मते मिळाली. याची बेरीज १३० होत असून यात पहिल्या पसंतीच्या मतांची बेरीज ११८ होते. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाने १५ मते अधिकची मिळवली. त्यात भाजपासोबत असणाऱ्या मित्रपक्षांच्या मतांचा समावेश असला, तरी भाजपने काँग्रेसची मते फोडल्याचीही चर्चा आहे.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने निवडणूक झाली. तर संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू झाली. विधानसभेच्या २८८ पैकी २७४ सदस्यांनी निवडणुकीसाठी मतदान केले. पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.
मतमोजणीला सुरुवात झाली तेंव्हा २५-२५ मतपत्रिकांचे १० तर ११ वा मतपत्रिकांचा गठ्ठा हा २४ चा तयार करण्यात आला. वैध मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्यावर विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा ठरवण्यात आला. दरम्यान मतपत्रिकांमधील एक मत बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या मतपत्रिकेवर दोन उमेदवारांना समान पसंती दिल्याने ही मतपत्रिका बाद झालेली आहे.
दरम्यान, या निकालानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून महायुतीच्या या विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाबाबत आनंद व्यक्त केला आहे. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की , आज महायुतीसाठी आनंदाची गोष्ट आहे. आमचे नऊ उमेदवार निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही जेव्हा नऊ जागा लढवण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेक जण वल्गना करत होते. आमचे उमेदवार पडतील, मात्र, आज आम्हाला आमची मते तर मिळालीच पण महाविकास आघाडीची मतेदेखील आम्हाला मिळाली आहेत.
राष्ट्रवादी अजित पवारांनाही जास्तीची मते …
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं दोन उमेदवार उभे केले होते. त्यांच्याकडे ४२ आमदारांचे संख्याबळ होते . विजयासाठी त्यांना ४६ मतांची आवश्यकता होती. पण त्यांच्या दोन्ही उमेदवारांना मिळून ४७ मते मिळाली. त्यामुळे अधिकची पाच मते त्यांना काँग्रेसकडून आली असल्याचे मानले जात आहे.
याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यांच्या पारड्यात ३७ आमदार व बच्चू कडू यांचे दोन अशी ३९ मते होती. त्याव्यतिरिक्त अपक्ष आमदारांचीही मतं त्यांच्या पाठिशी होती. या निवडणुकीत एकूण ४९ मतांनिशी शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार जिंकून आले. त्यामुळे शिंदे गटाच्या मतांच्या बेरजेतही काँग्रेसच्या फुटलेल्या मतांचा वाटा असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसची मते गेली कुठे ?
काँग्रेसकडून फक्त प्रज्ञा सातव या एकमेव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. पण त्यांचे ३७ आमदार आहेत. त्यांच्याकडे असणारी अतिरिक्त १४ मते नेमकी कुणाकडे गेली? यावर आता पक्षीय पातळीवर चर्चा होणार असून त्यातली पाच मते अजित पवारांच्या उमेदवारांच्या पारड्यात गेल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
मिलिंद नार्वेकर दुसऱ्या पसंतीच्या मतांवर जिंकले
दरम्यान उद्धव ठाकरेंचे १५ आमदार असताना मिलिंद नार्वेकरांना पहिल्या पसंतीची २२ मते मिळाली होती. पण एका मतासाठी त्यांना दुसऱ्या पसंतीच्या मतांवर अवलंबून राहावे लागले . प्रज्ञा सातव यांच्या दुसऱ्या पसंतीच्या तीन मतांच्या रुपाने मिलिंद नार्वेकरांच्या पारड्यात विजयश्री पडल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले शेकापचे जयंत पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला. शरद पवार गटाचे १२ आमदार आहेत. या सर्व १२ आमदारांची मते जयंत पाटील यांना पडली. मात्र, त्याउपर इतर मतांची जुळवाजुळव त्यांना करता आली नाही. शिवाय काँग्रेसची मतेही त्यांना न गेल्याने पराभवाचा सामना करावा लागला.
विधानपरिषद निवडणूक निकालाची अंतिम आकडेवारी
महायुतीचे उमेदवार
भाजपा
पंकजा मुंडे – २६ (विजयी)
परिणय फुके – २६ (विजयी)
योगेश टिळेकर – २६ (विजयी)
अमित गोरखे – २६ (विजयी)
सदाभाऊ खोत – २६ (विजयी)
शिवसेना एकनाथ शिंदे गट
भावना गवळी – २४ (विजयी)
कृपाल तुमाने – २५ (विजयी)
राष्ट्रवादी अजित पवार गट
राजेश विटेकर – २३ (विजयी)
शिवाजीरावर गर्जे – २४ (विजयी)
महाविकास आघाडीचे उमेदवार
काँग्रेस
प्रज्ञा सातव – २५ (विजयी)
शिवसेना उद्धव ठाकरे गट
मिलिंद नार्वेकर – २४ (विजयी)
राष्ट्रवादी शरद पवार गट
जयंत पाटील(शेकाप) – १२ (पराभूत)