IndiaNewsUpdate : वाराणसीत पंतप्रधानांच्या गाडीवर फेकली चप्पल , सुरक्षेत मोठी चूक ….
वाराणसी : लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाराणसी मतदारसंघाच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान मोदींनी पीएम किसान योजनेचा निधी जारी करण्याबरोबरच इतरही अनेक योजनांसंदर्भात घोषणा केल्या. तसेच, गंगेवर आरतीदेखील केली. मात्र, मोदींचा ताफा वाराणसीतून निघताना त्यांच्या गाडीवर कुणीतरी चप्पल फेकून मारल्याचा दावा आता केला जात आहे. यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सुरक्षारक्षक गाडीच्या बोनेटवरून चप्पल उचलून बाजूला फेकत असल्याचं दिसत आहे.
नेमकं घडलं काय?
हा व्हिडीओ गुरुवारी संध्याकाळचा असल्याचं सांगितलं जात आहे. मोदींचा वाराणसी दौरा संपल्यानंतर त्यांचा ताफा तिथून विमानतळाच्या दिशेने निघाला. रस्त्यात दुतर्फा मोठ्या संख्येनं लोक उभे होते. ‘मोदी, मोदी’च्या घोषणाही व्हिडीओमध्ये ऐकू येत आहेत. सुरुवातीच्या दोन गाड्या निघाल्यानंतर एक काळ्या रंगाची गाडी मागून आली आणि त्या गाडीवर कुणीतरी चप्पल फेकल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. नंतर कार पुढे येताच कारमधील सुरक्षारक्षकानं बाहेर येऊन बोनेटवरून ती चप्पल उचलून बाजूला फेकली. यावेळी पुढच्या सीटवर खुद्द पंतप्रदान नरेंद्र मोदी बसल्याचं दिसत आहे.
https://x.com/SevadalGN/status/1803331225555443934?
“चप्पल फेंक के मारा”
दरम्यान, व्हिडीओमध्ये कारवर फेकलेली वस्तू नेमकी कुठली आहे? यासंदर्भातही सध्या वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. ती चप्पलच होती, असं सोशल मीडियावरील अनेक पोस्टमधून सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये एका व्यक्तीचा बोलण्याचा आवाज येत आहे. त्यात ही व्यक्ती मोदींच्या कारवर ती वस्तू पडल्यानंतर “चप्पल फेंक के मारा अभी”, असं बोलताना ऐकू येत आहे. मात्र, बोलणारी व्यक्ती व्हिडीओमध्ये दिसत नाहीये.
सुरक्षेत कुचराई?
पंतप्रधान नरेंद्र मोदींना अत्युच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. अशा वेळी त्यांच्या ताफ्यातील त्यांच्याच कारवर कुणीतरी चप्पल किंवा आणखी कुठली वस्तू फेकणं ही मोदींच्या सुरक्षेतली गंभीर कुचराई असल्याचं आता बोललं जात आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ शेअर करत अनेक नेटिझन्सनी या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
काँग्रेसकडून निषेध…..
दरम्यान, इतर युजर्सप्रमाणेच काँग्रेसच्याही काही हँडल्सवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मात्र, त्यात प्रश्न उपस्थित करून या घटनेचा निषेध करण्याची मागणी केली जात आहे. “हे खरं आहे का? मोदींच्या कारवर कुणीतरी चप्पल फेकून मारली आहे? या घटनेचा तीव्र निषेध व्हायला हवा”, अशी पोस्ट गांधीनगर काँग्रेस सेवादलाच्या एक्स हँडलवर करण्यात आली आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता मोठी चर्चा होताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेची सविस्तर चाचपणी करून नेमकं घडलं काय, याचा आढावा घेतला जात असल्याचं सांगितलं जात आहे.