CongressNewsUpdate : कॉंग्रेसच्या गट नेतेपदी राहुल गांधी यांची निवड , विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याचीही मागणी …

नवी दिल्ली : एकीकडे देशाच्या 18 व्या लोकसभा निवडणुकानंतर भाजप नेते नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथ घेत आहेत तर दुसरीकडे विरोधी इंडिया आघाडीने विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची मागणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही राहुल गांधींच्या नावासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे, संसदेतील विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधींचीच निवड होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीमध्ये अनेक सदस्यांनी राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेतेपद घ्यावे , यासाठी विनंती केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील राहुल गांधी यांना पक्ष सदस्यांच्या भावना मान्य करावे लागतील, असे म्हटले आहे. तर, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संसदेतील विरोधीपक्षनेतेपदासाठी राहुल गांधींच्याच नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाल्याचे काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल राव यांनीही सांगितले आहे. तर, काँग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून राहुल गांधींनी निवड झाल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे, राहुल गांधींच विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवर बसू शकतात हे जवळपास निश्चित झाले आहे.
राहुल गांधी डोळ्यात डोळे घालून बोलू शकतात….
राहुल गांधी धाडसी आणि साहसी नेते आहेत, ते डोळ्यात डोळे घालून बोलू शकतात. ते महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती ठेवतात. त्यामुळे, त्यांनाच संसदेतील विरोधी पक्षनेतेपदी जबाबदारी देण्यात यावी, अशी काँग्रेस कार्यकारणीच्या समितीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे, असे खासदार प्रमोद तिवारी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालात भाजपप्रणित एनडीए आघाडीला 294 आणि इंडिया आघाडीला 232 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे, बहुमताच्या जोरावर एनडीएन आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची गटनेतेपदी निवड केली आहे. घटकपक्षांनीही मोदींच्या नावावर एकमत केल्यामुळे आता 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तर, राहुल गांधींचीही विरोधी पक्षनेता म्हणून लवकरच अधिकृच घोषणा होऊ शकते.