Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात ६०. ३७ टक्के मतदान , पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७०.०३ टक्के मतदान !!

Spread the love

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व अखेरच्या टप्प्यात शनिवारी ६०.३७ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७०.०३ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

सात राज्यांमधील ५७ मतदारसंघांमध्ये शनिवारी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून निवडणुकीस उभे असून या मतदारसंघात ५६.३५ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तुरळक घटना सोडल्यानंतर सर्व राज्यांत शांततेत मतदान झाल्याचे आयोगाने सांगितले. ओडिशा राज्याच्या विधानसभेच्या उर्वरित ४२ मतदारसंघातही मतदान झाले.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, ४ जून रोजी होणार आहे. ओडिशा व आंध्र प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणीही याच दिवशी होणार आहे. अरुणाचल प्रदेश व सिक्कीम या राज्यांमध्ये मात्र रविवार, २ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

जगातील सर्वात उंच मतदान केंद्रावर मतदान

मंडी लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या लाहौल-स्पितीमधील ताशीगंग या जगातील सर्वात उंच मतदान केंद्रावर मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. या आदिवासी पट्ट्यातील मतदार पारंपरिक पोशाखात मतदान केंद्रावर आले होते. स्पिती खोऱ्यातील या मतदान केंद्रावर ७९ टक्के मतदान झाले. या मतदान केंद्रावर प्रथमच मतदान करणाऱ्या १८ वर्षीय कुंजोक तेनझिनने आपला उत्साह व्यक्त केला. ‘‘आम्ही फक्त पुस्तकात वाचायचो किंवा ज्येष्ठांकडून मतदानाविषयी ऐकायचो. पण यावेळी पहिल्यांदा मतदान करण्याची संधी मिळाल्यावर मला खूप आनंद झाला. मी देशातील सर्वोच्च मतदान केंद्रावर मतदान केले आहे,’’ असे तो म्हणाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!