Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मुंबईत पेट्रोल पंपावर लोखंडी होर्डिंग कोसळल्याने ८ जणांचा मृत्यू तर ५९ गंभीर जखमी

Spread the love

मुंबई : मुंबईतील वादळामुळे घाटकोपरच्या पूर्व द्रुगती मार्गावरील पेट्रोल पंपावर लोखंडी होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली असून या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे तर ५९ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच आतापर्यंत ६७ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचे तसेच या घटनेत मृत झालेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखाची मदत जाहीर केली आहे.

या घटनेबद्दल बोलताना त्यांनी शोक व्यक्त केला असून मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले. तसेच जे होर्डिंग अनाधिकृत आहेत, त्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही आम्ही आयुक्तांना दिले आहेत, असे ते म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारद्वारे मुख्यमंत्री साहायता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, तसेच या घटनेत जखमी झालेल्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचे सांगितले.

या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माध्यमांशी बोलताना या दुर्घटनेत आतापर्यंत ६७ नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. तसेच या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून याप्रकरणी दोषी आढळल्या त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!