WorldNewsUpdate : डॉ. आंबेडकर जयंती दिनी अमेरिकेत साजरा होणार समता दिन , भव्य सोहळ्याचे आयोजन …

न्यू जर्सी : अमेरिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय मिशन यूएस यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने, जर्सी सिटी हॉल न्यू जर्सी येथे 14 एप्रिल 2024 रोजी समता दिवस साजरा करण्यात येणार आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समानता आणि सामाजिक न्यायाच्या कार्याचा सन्मान म्हणून समानता दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी दुपारी साडेतीन वाजता , 280 ग्रोव्ह स्ट्रीट , जर्सी सिटी येथील सिटी हॉलच्या बाल्कनीमध्ये निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करून करण्यात येणार आहे
अमेरिकेतील न्यू जर्सी हे राज्य राज्य विविधता समानता आणि समावेशकतेचे धोरण जोपासण्यात अग्रेसर आहे. जर्सी सिटीचा इतिहास हा स्थलांतरित लोकांचे आश्रयस्थान म्हणून आहे. जर्सी सिटी मध्ये स्थलांतरित झालेल्या अनेक सांस्कृतिक सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी असलेले लोक , येथे समता दिन साजरा करून बाबासाहेबांच्या जागतिक स्वरूपाच्या कार्याचा स्वीकार करून समतेचे वातावरण निर्माण करतात. त्याचाच एक भाग म्हणून 14 एप्रिल 2022 पासून हा दिवस समता दिवस म्हणून घोषित करणे हा एक महत्त्वपूर्ण टप्पा होता . त्यानुसार हा सोहळा प्रशासनाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येतो.
समता दिनानिमित्त सिटी हॉलीमारतीवर अमेरिकेच्या ध्वजा बरोबर समतेच्या निळा ध्वज फडकवणे या प्रसंगाचे महत्त्व दर्शविते तसेच परदेशातील भारतीय समाजातील सर्वात जुनी आंबेडकरवादी संस्था असलेल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशनचा प्रभाव आणि कार्यक्षेत्र ही अधोरेखित करते.
डॉ. आंबेडकर यांनी अस्तित्वात असलेल्या सामाजिक व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी आणि मजुरांच्या हक्कासाठी आणि महिलांच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले . याची जाणीव ठेवून यंदाचा सोहळा त्यांच्या संघर्षाची आठवण देणारा संगम आहे. या कार्यक्रमात आफ्रिकन अमेरिकन आणि नेपाळी स्थलांतरित समुदायांचे कथन तसेच महिलांच्या सशक्तिकरणाच्या दिशेने सुरू असलेला प्रवास सांगण्यात येणार आहे.
ज्वायसी ई वॉटरमन ज्या मंडळाध्यक्ष आहेत आणि त्या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन अमेरिकन महिला आहेत त्यांच्यासोबत नेपाळमधील दलित महिलांच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या संघटनेच्या (ADWAN) संस्थापिका अध्यक्ष डॉ. विष्णू माया परियार यांची या सोहळ्याला उपस्थिती राहील.
दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चिरस्थायी वारशाला आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या जयंतीदिनी समता दिवस साजरा करण्याचा आम्हाला बहुमान आहे असे डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन यूएसए च्या आयोजकांनी म्हटले आहे. हा कार्यक्रम समतेच्या लढाईची आठवण करून देतो आणि सर्वांसाठी समान संधी आणि सामान न्याय असलेल्या जगाकडे नेणारे डॉ. आंबेडकर यांचे कार्य पुढे चालू ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करतो
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून इच्छुक सहभागी व्यक्तींनी अधिक माहितीसाठी ambedkarMission.org/133rdJayanti या संकेत स्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय माध्यमांशी संबंधित चौकशीसाठी [email protected]
या ईमेलवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.