अजूनही वेळ गेली नाही, वंचितला किती जागा पाहिजेत सांगा, पण मतांचे विभाजन करू नका, नाना पटोले यांची प्रकाश आंबेडकर यांना नवी ऑफर….

अकोला : बाळासाहेब तुमची युती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत होती तरीही आपण माझ्या विरुद्ध सातत्याने आरोप करीत आलात तरीही हरकत नाही, आज मी तुम्हाला शब्द देतो अजूनही वेळ गेलेली नाही. महा विकास आघाडीसोबत या , मतांचे विभाजन टाळा. तुम्हाला दोन-तीन काय जागा पाहिजेत ते सांगा. माझ्या पातळीवर मी फायनल करतो, तुम्ही म्हणता मला अधिकार नाही पण तरीही हा माझा शब्द आहे अशी ऑफर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अकोला येथे बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना दिली आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाने एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले असतानाच, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज अकोला येथे काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आले होते . या प्रचार सभेत बोलताना त्यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर दिली आहे.
यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, “बाळासाहेब, आणखी रस्ते बंद झाली नाहीत. मी पुढाकार घेतो. तुमच्या भूमीत येऊन सांगतो. नामांकन मागे घेईपर्यंत वेळ आहे. किती जागा पाहिजे ते सांगा. 2-3 किती पाहिजे ते सांगा, पण भाजपला पराभूत करण्यासाठी समोर या. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत वेळ आहे. मग पुढची लढाई सुरू होईल. मैदान सुरू झाले तर खुप मुद्दे आहेत, आयुध आहेत”.
नाना पटोले पुढे म्हणाले, तुम्ही म्हणता नाना पटोलेला अधिकार नाहीत. मी स्वत:च्या बळावर सांगतो की, सोबत या. पक्षश्रेष्ठींशी मी बोलेन. प्रकाश आंबेडकरजी अद्याप वेळ गेलेली नाही. 2014 आणि 2019 या दहा वर्षाच्या कालावधीत मतांचे मोठं विभाजन झाले होते. फुले-शाहू-आ़बेडकरांच्या महाराष्ट्रात मतांचे विभाजन करण्याचे षडयंत्र भाजपने नेहमीच रचले, असेही पटोले यांनी नमूद केले.
मी मोदींना समोरासमोर विरोध केला
कोश्यारींनी सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला. एका मंत्र्यांच्या तोंडावर शाई फेकल्यावर पोलिसांना निलंबित केले गेले. हे लोक असेच करू शकतात. मी खासदार असताना मी मोदींना समोरासमोर विरोध केला. अकोल्याचे भाजप खासदार सध्या व्हेंटीलेटरवर आहेत. हे लोक त्यांचे व्हेंटीलेटर कधी काढणार हे सांगता येत नाही. कदाचित निवडणुकीतच काढतील, असंही नाना पटोले म्हणाले.
आंबेडकरांनी माझा अपमान केला…
बाळासाहेब आंबेडकरांनी माझा नेहमीच अपमान केला. माझ्या पोटनिवडणुकीत त्यांनी उमेदवार दिला. मी भाजप सोडले तेव्हापासून प्रकाश आंबेडकरांनी माझा राग करणे सुरू केले आहे. आंबेडकरांनी मुंबईतील संविधान बचाव रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निमंत्रित केले होते पण त्यांना वेळ नसल्याने, पक्षाने आदेश दिला की, तुम्ही रॅलीमध्ये जा. मी त्यांना तसा फोन केला. तेंव्हा त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की , तुम्हाला बोलावलेले नाही. मी म्हणालो तरीही पक्षाचा आदेश असल्याने मी येईल आणि सभेत समोर बसेल. त्याप्रमाणे मी सभेला गेलो. मला स्टेजवर कोपऱ्यात बसवण्यात आले मी बसलो. माझ्या भाषणात एक चूक झाली त्याबद्दल मी माफीही मागितली पण मला ट्रोल केले गेले. माझा अपमान केला गेला. तरीही मतांचे विभाजन होऊ नये म्हणून वंचितने महा विकास आघाडीसोबत यावे ही माझी आणि माझ्या पक्षाची भावना आहे.
दुसरे म्हणजे आंबेडकर खर्गेंना कधीच भेटले नाहीत. त्यांनी खरगे यांना पत्र पाठवले आणि त्यांना भेटायला स्वतः न जाता कुणी तरी माणूस पाठवला. ते म्हणाले मी, त्याच्यासोबत काय चर्चा करू ? आंबेडकरांनी, माझ्या नावाने चुकीचे आरोप केलेत. वेळोवेळी माझा अपमान केला. पुढे तेच आघाडीतून बाहेर पडले. उमेदवार घोषित केले. आम्ही शेवटपर्यंत त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. माझे सर्वच पक्षात मित्र, देवेंद्र फडणवीसही माझे मित्र आहेत, पण मैत्री आपल्या जागी आणि आपले विचार आपल्या जागी असेही नाना पटोले यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
माझ्या रक्तात मॅच फिक्सिंग नाही
नाना पटोलेच्या रक्तात मॅच फिक्सिंग नाही. डॉ. अभय पाटलांची उमेदवारी मागे घेणार आहेत,अशी अकोल्यात हवा उडवण्यात आली. पण मी सांगतो की असे होणार नाही. भाजपचे धोरण 400 पार नाही त्यांना चारशे विशी करायची आहे. आंबेडकरांनी शिरूरमध्ये दिलेल्या उमेदवाराचे आडनाव चुकीचे आहे. तो उमेदवार फडणवीस यांच्या बरोबर फिरत होता नंतर तो वंचितचा उमेदवार झाला.
याठिकाणी मी सांगतो की, मी पण वंचित आहे. शेतकऱ्याचा मुलगा आहे. बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा एका मिनिटात राजीनामा दिला होता. मी पण दिला. मग बाबासाहेबांचा खरा अनुयायी कोण? असा सवालही करीत नाना पटोले म्हणाले मी बाबासाहेबांचा खारा अन्यांयुयायी आहे.