MaharashtraLoksabhaNewsUpdate ” निर्भय बनो” चे प्रकाश आंबेडकरांचे मन वळविण्याचे प्रयत्न , लिहिले खुले पत्र ….

मुंबई : लोकसभा निवडणुकीत लोकशाहीवादी , धर्मनिरपेक्ष मतदानाचे विभाजन टाळण्यासाठी निर्भय बानो अभियानाच्या संयोजकांनी पुढाकार घेऊन वंचित बहुजन आघाडीला खुले पत्र लिहिले आहे. जागावाटपातील संभ्रमावस्था लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
निर्भय बनोच्यावतीने असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांनी वंचितला वंचित आणि महाविकास आघाडीमधील मतभेद मिटवण्यासाठी हे खुले पत्र लिहिले आहे. वंचित बहुजन आघाडी यांनी त्यांना कुठले मतदारसंघ हवे आहेत, ते पत्राच्या माध्यमातून कळवावे. वंचितने असे पत्र दिल्यास त्याआधारावर आम्ही इतर पक्षांशी संपर्क साधू, असे निर्भय बनोच्या वतीने सांगण्यात आले आहे.
जागावाटपामधील संभ्रमावस्था ही लोकशाहीसाठी धोकादायक आहे. यावेळची लोकसभा निवडणूक संविधानाच्या रक्षणासाठी महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा पराभव करण्यासाठी आता केवळ संविधान रक्षण महत्त्वाचे मानले पाहिजे. वंचितने लोकशाही मानणाऱ्या इतर सर्व पक्षांसोबत राहावे, असे आवाहन या पत्रामधून करण्यात आले आहे.
दरम्यान विरोधी पक्षांमध्ये ऐक्य साधून मतविभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येईल, अशी मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र जागावाटपामध्ये मतभेद झाल्याने मविआ आणि वंचित यांच्यातील संभाव्य आघाडी मोडली आहे. मात्र आता वंचित आणि मविआमध्ये झालेले मतभेद मिटवण्यासाठी ‘निर्भय बनो’कडून पुढाकार घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.