देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाविषयी द्वेष , जरांगे पाटील यांचे गृहमंत्र्यांवर पुन्हा टीकास्त्र

बीड: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेसीबी मालकांवर गुन्हे दाखल करणे बंद करावे. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मागणीवर आम्ही ठाम आहेत. आम्हाला जाणीवपूर्वक अडचणींत आणण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. जाणीवपूर्वक मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत हे केले गेले . मात्र न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला. खरे तर सरकारने ही भूमिका घ्यायला हवी होती. पण तसे झाले नाही. एकीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मला पहाटे तीन वाजता फोन करून गोड बोलतात आणि दुसरीकडे आमच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जातात याबद्दल आम्ही २४ तारखेला पुढील दिशा ठरवणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बीड येथे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की , आंदोलन, कार्यक्रम चार महिन्यांपूर्वी झाले त्याचे गुन्हे आत्ता दाखल केले जात आहेत. जेसीबी लावले त्याचे गुन्हे आत्ता दाखल करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हे सगळं सुरु केलं आहे. माझ्या घराला तर नांदेडपासून नोटीस आली आहे. मी फुटणार नाही, हटणार नाही. कायद्याचं पालन करणार आहे. आदर्श आचारसंहिता आहे तोपर्यंत यांना पुन्हा सुख मिळतंय हरकत नाही. पण मी मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही. ” असं जरांगे यांनी म्हटलं आहे.
“माझ्या समाजाविषयी म्हणजेच मराठा समाजाविषयी द्वेष व्यक्त होतो आहे. आता बाकीच्या जाती-धर्माच्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही लढतो आहोत. मात्र गृहमंत्र्यांचा द्वेष खूप भयंकर आहे. पोलीस करत आहेत असं सांगितलं जातं आहे. पण गृहमंत्री आमच्या विरोधात आकसाने वागत आहेत” असा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी मला तीन वाजता फोन केला…
“मला देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला होता. गुन्हे मागे घेतो असंही सांगितलं. त्यांना बोलायचं नव्हतं पण तरीही ते बोलले. एक वाजता आधी फोन केला, तो मी घेतला नाही. त्यानंतर पहाटे तीन वाजता फोन केला. त्यांचे लोक येऊन बसले. मला सांगितलं की इथून पुढे काही होणार नाही. पण कारवाया सुरुच आहेत. याचा अर्थ एकीकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून द्वेष दाखवून मराठे संपवायचे असंच दिसतं आहे. एकीकडे सांगायचं आता काही होणार नाही. दुसरीकडून कारवाया सुरुच आहेत. ” असा गौप्यस्फोट मनोज जरांगेंनी केला आहे.
अन्यथा मी महाराष्ट्रात फिरुन मराठा समाज जागा करेन…
मनोज जरांगे पाटील यांच्या बीडमध्ये झालेल्या इशारा सभेत वापरण्यात आलेल्या जेसीबी मालकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. यावर बोलताना म्हणून जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री गुन्हे दाखल करणार नाहीत असे म्हणतात आणि गृहमंत्री गुन्हे दाखल करायला लावतात. हे गुन्हे दाखल करणे थांबले नाही तर परवापासून महाराष्ट्राचा दौरा करावा लागेल आणि संपूर्ण मराठा समाज जागा करावा लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना कायदा लागू होत नाही का? राजकीय नेते सभा घेतात त्यांना परवानगी मिळते मग आम्ही सामाजिक बैठका घेऊ शकत नाहीत का? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला असून सरकार जरी आमच्यासोबत अन्यायाने वागत असलं तरी न्यायदेवता योग्य न्याय करेल, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
आचारसंहिता लागण्याच्या अगोदर सरकारने सगेसोयरे अधिसूचना जारी करणार म्हणून कॅबिनेट बैठक घेतली होती. मात्र, या बैठकीमध्ये कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही आणि आचारसंहितेचा कारण पुढे करून सरकारने डाव जरी टाकला असला तरी २४ तारखेला जी महत्त्वाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार असून ९०० एकरावर सभा नेमकी कुठे घ्यायची याची देखील घोषणा त्या बैठकीत करणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
तर १० टक्के आरक्षण आम्हाला मान्य नसून सध्याची भरती सरकारकडून करण्यात येत आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना घेता येत नसल्याचे अनेक फोन येत आहेत. ज्यांना हे आरक्षण घ्यायचे असेल त्यांनी ते घ्यावं आमचं बंधन नाही. मात्र आम्ही ओबीसीतून आरक्षण घेण्यावर ठाम असल्याचे जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले.