MahavikasAghadiNewsUpdate : महाविकास आघाडीची जागा वाटपासाठी आज अंतिम बैठक , जागा वाटप पूर्ण , वंचितला ४ जागा : संजय राऊत

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण झाल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला असून महाविकास आघाडीकड़ून ववंचितसाठी ४ जागा सोडण्यात आल्या असून याबाबत आता त्यांना निर्णय घ्यायचा आहे असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे आज महाविकास आघाडीची अंतिम बैठक होत आहे.
आज महाविकास आघाडीची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक होत असून या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा होणार आहे. ही चर्चा झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला प्रस्ताव दिला जाणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्येच वंचित बहुजन आघाडीला जागा किती सोडायच्या यावर एकमत नसल्याचे समोर आले होते. राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीला चार जागांची ऑफर देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचा मतदारसंघ असलेल्या अकोला लोकसभेचाही समावेश आहे. त्यामुळे निर्णय काय घ्यायचा हा सर्वस्वी त्यांचा निर्णय त्यांचा असल्याचे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान राऊत यांनी राज्यातील मुस्लिम आणि दलित मतदार यावेळी भाजपला मतदान करणार नसल्याचे म्हटले आहे. वंचित आणि एमआयएमच्या संभाव्य आघाडीवरती संजय राऊत यांनी भाष्य केले. या दोन्ही पक्षांची युती होणार नाही, आम्ही तीन प्रमुख पक्ष आणि इतर घटक पक्ष सोबत असल्याचे संजय राऊत म्हणाले.
पुण्याची जागा काँग्रेसकड़े
मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केलेल्या वसंत मोरे यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची सुद्धा भेट घेतली. या भेटीवर राऊत यांनी खुलासा केला. वसंत मोरे मला भेटण्यासाठी आले होते. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली असून मी त्यांना पक्ष येण्याची ऑफर दिल्याचे राऊत यांनी सांगितले. ते पुणे लोकसभेसाठी इच्छुक असून ती जागा शिवसेनेकडे नसून काँग्रेसकडे असल्याचे संजय राऊत म्हणाले. त्यामुळे त्या जागेबाबत काँग्रेस नेत्यांचा निर्णय होईल असे त्यांनी सांगितले.
दरम्यान निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीवरुन राऊत यांनी भाष्य केले. भाजपने निवडणूक आयुक्तालय ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयुक्तांची निवड होते. त्यामुळे शंभर वर्षे लोकशाही वाचवण्यासाठी अनेकांनी लढा दिला असून आमच्यासारखे लढा देत राहतील असे ते म्हणाले.