पंजाब-हरियाणा सीमेवरील शेतकरी आंदोलकांचे पासपोर्ट आणि व्हिसा होणार रद्द

पंजाब-हरियाणा सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या, हिंसाचारात गुंतलेल्या आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांचे पासपोर्ट आणि व्हिसा हरियाणा पोलिसांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान अंबाला पोलिस उपअधीक्षक जोगिंदर शर्मा यांनी सांगितले की, शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली सीमेजवळ हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटली आहे. आम्ही त्या समाजकंटकांची सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ओळख पटवली आहे.
त्यांचे व्हिसा आणि पासपोर्ट रद्द करावे, अशी विनंती आम्ही गृहमंत्रालय आणि दूतावासांना करणार आहोत. त्यांची छायाचित्रे, नावे आणि पत्ते पासपोर्ट कार्यालयात देण्यात आले आहेत.
त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली असल्याचेही शर्मा यांनी सांगितले आहे. तर, सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा भाग असलेल्या काही शेतकरी नेत्यांच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या (एनएसए) तरतुदी लागू करण्याचा आपला पूर्वीचा निर्णय मागे घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी व्हावी, यासाठी पंजाबमधील शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. ते दिल्लीकडे कूच करत आहेत. मात्र १३ फेब्रुवारी रोजी या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले असता, आंदोलक शेतकऱ्यांनी पंजाबमधून हरयाणादरम्यानच्या शंभू सीमेवर उभारलेल्या बॅरिकेडची नासधूस केली.
या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला तसेच, ड्रोन कॅमेऱ्याद्वारे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. संगरूर येथील मुनाक सीमेजवळही आंदोलक हिंसक झाले होते. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी पुन्हा हिंसाचार भडकला होता. खनौरी येथे जाणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरयाणा पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला होता.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765