MarathaReservationUpdate : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे आजपासून पुन्हा आमरण उपोषण

जालना : मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी १५ फेब्रुवारीपासून आरक्षणाच्या कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याचा शब्द सरकारने दिला असला तरी कोणताही दगा फटका होऊ नये म्हणून आजपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता त्यानुसार आज जरांगे पाटील आपल्या उपोषणाला सुरुवात करीत आहेत. अलीकडेच त्यांनी आपला राज्य दौरा संपवला आहे.
गेल्या २७ जानेवारी रोजी नवी मुंबईत पोहोचलेल्या मराठा आंदोलकांना सामोरे जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले होते . तसेच, इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार असंही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे आपले आंदोलन स्थगित केल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली होती.
सगेसोयऱ्यांच्या कायद्याबाबात सरकारची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे मी आजपासून बेमुदत उपोषणाला बसत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. मनोज जरांगे यांची अंतरवालीत आज सकाळी महत्त्वाची बैठक होणार आहे.
या बैठकीनंतर मनोज जरांगे उपोषणाला बसतील. राज्य सरकारकडून दगाफटका झाला तर ही बाब मराठा समाजाला परवडणार नाही, असेही ते म्हणाले. येत्या १५ फेब्रुवारीपासून राज्य सरकराने अधिवेशन बोलावले असले तरीही जरांगे उपोषणावर ठाम आहेत.
मनोज जरांगे यांनी म्हटले आहे की , सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही. विधानसभेचे अधिवेशन होऊन गेल्यानंतर आम्हाला काहीच हालचाली करता येणार नाहीत. नागपूरला झालेल्या हिवाळी अधिवेशनावेळीसुद्धा असेच झाले होते .
त्यावेळी असं अधिवेशन होऊन गेले. परंतु, आमचा प्रश्न सुटला नाही. आता १५ फेब्रुवारीपासून अधिवेशन आहे. परंतु, राज्य सरकारकडून पुन्हा तसा दगाफटका झाला तर माझ्या समाजाला ते परवडणार नाही. म्हणून मी १० फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार आहे.
जरांगे पाटील यांनी पुढे म्हटले आहे की , मी सर्व मराठा बांधवांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपापल्या मतदारसंघातील आमदारांना फोन करावा. हा काही आमचा आडमुठेपणा नाही. ते आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या हक्काचे आहेत. आमचा त्यांच्यावर अधिकार आहे.
आम्ही समाजाने मिळून त्यांना निवडून दिलं आहे. त्यामुळे आमच्या लेकरांचा विषय त्यांनी अधिवेशनात मांडावा. आरक्षणाचा विषय विधानसभेत मांडला जाईल तेव्हा सर्व आमदारांनी आणि मंत्र्यांनी आपली बाजू मांडली तर आरक्षणाचा कायदा मजबूत होईल.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765