ईडीच्या धाडीवर बोलले आ. रोहित पवार , मी काही चुकीचे केले असते तर अजित अजितदादांसोबत भाजपमध्ये गेलो असतो..

पुणे: शुक्रवारी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या मालकीच्या बारामती अॅग्रो कंपनीची ईडीकडून १४ तास चौकशी करण्यात आली. ईडीचे अधिकारी या कंपनीचे काही कागदपत्रे घेऊन गेल्याची सूत्रांची माहिती आहे. यावर बोलताना मी काही चुकीचे केले असते तर देशात परत आलो नसतो, अजितदादांसोबत भाजपमध्ये गेलो असतो अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की , गेल्या सात दिवसामागे दिल्लीला कोण कोण गेले होते ? त्याची माहिती घ्या, त्यामध्ये भाजपचे आणि अजित पवारांचे कोण सोबती गेले होते याची माहिती घ्या. त्यानंतर सर्व घटनाक्रम लक्षात येईल. दरम्यान, रोहित पवारांच्या या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की , रोहित पवारच्या प्रश्नाला उत्तर द्यावे , इतका तो मोठा झालेला नाही, तो बच्चा आहे, त्यावर माझे प्रवक्ते बोलतील.
ईडीच्या अधिकाऱ्यांवरही आपला आक्षेप नाही
ईडीने कारवाई केली त्यावेळी आपण परदेशात होतो. मी काही चुकीचे केले असते तर मी आज सकाळी लगेच आलो नसतो. अधिकाऱ्यांचे काही चुकत नाही. ज्या गोष्टी मला माहित नाहीत त्याची मला मिडीयाकडून माहिती मिळत आहे. हा विषय ईडी आणि आमच्यातील विषय होता. पण काहींना राजकारण करायचे आहे. रोहित पवार पुढे म्हणाले की, आमच्यासाठी महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची आहे. महाराष्ट्र धर्म आणि विचार महत्त्वाचा आहे. यात काही नेते आमच्या कंपनीत घोटाळा झाल्याचे मोठ्या आवाजात सांगत आहेत. यात काही मनी लाँड्रिंगचा काही विषय नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांवरही आपला काही आक्षेप नाही. आमच्याकडून त्यांना पूर्ण सहकार्य असेल. या आधी ज्यांच्यावर ईडीने कारवाई केली त्यांची यादी एकदा पब्लिश करा. आता ते नेते त्याच पक्षात आहेत की भाजपमध्ये गेलेत याचीही माहिती घ्या.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या शहरात असतात, त्या शहरात दिवसाढवळ्या खून होतात. फडणवीस यांनी कोणतेतरी एकच पद सांभाळावे. त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली.
भाजप आमदार सुनिल कांबळेंबाबत अजित पवार गप्प का?
भाजप आमदार सुनिल कांबळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर पोलिस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. तरिही अजित पवार गप्प का होते? असा सवाल रोहित पवारांनी या वेळी बोलताना केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत असूनही मोठ्या आवाजात बोलत आहेत. आमच्यावर कारवाई होण्यापूर्वी दिल्लीत कोण गेले होते ते माहिती आहे, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.
दरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. गेल्या २ वर्षांपासून ते मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही, त्यामुळे त्यांचा मेंदू छोटा झालाय. ते काहीही बोलत असतात, असे पवार म्हणाले.
धर्म व्यक्तीगत प्रश्न , त्याचा राजकीय वापर नको…
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामाबाबत वादग्रस्त विधान केले होते. यावरही रोहित पवार यांनी भाष्य केले. रोहित पवार म्हणाले, इतिहासात काय घडलं? आपल्याला काही माहिती नाही. आज बरोजगारीचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे. सामन्यांचा प्रश्नांवर बोलले पाहिजे. धार्मिक मुद्यावर टीप्पणी करु नये, याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला आहे. जितेंद्र आव्हाड मोठे आणि अभ्यासू नेते आहेत. मात्र, सध्याच्या वातावरणामध्ये ते स्टेटमेंट योग्य नव्हते. धर्म व्यक्तीगत प्रश्न आहे. त्याचा राजकीय वापर नको.