MarathaReservationNewsUpdate : खासदार संभाजी राजे आयोजित बैठकीत काय झाले ? या खासदारांची होती उपस्थिती ..

नवी दिल्ली : मराठा आरक्षण प्रश्नावर संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्लीमध्ये राज्यातील सर्व खासदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीला अनेक खासदारांची अनुपस्थिती होती. त्यावरुन संभाजीराजेंनी संताप व्यक्त केला. या बैठकीमध्ये दोन महत्त्वाचे ठराव झाल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. या बैठकीला विविध पक्षांचे मिळून २१ खासदार उपस्थित होते. या बैठकीसाठी निमंत्रित बड्या खासदारांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी राज्यात मनोज जरांगे पाटील यांचा गेल्या काही महिन्यांपासून लढा सुरू आहे. या लढ्याबाबत महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी दिल्लीमध्ये संसदेत आवाज उठवला पाहिजे आणि मराठा आरक्षणाच्या लढाईला बळ दिले पाहिजे अशी भूमिका घेत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिल्ली येथे महाराष्ट्रातील सर्व पक्षीय लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला राज्यसभा आणि लोकसभेचे महाराष्ट्रातील २१ खासदार उपस्थित होते. बड्या खासदारांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले..
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, आरक्षणाचा विषय केंद्र सरकारच्या हातातला आहे. घटनादुरुस्तीने भलेही राज्याला आरक्षणाचे अधिकार दिले असतील. परंतु त्यासाठी अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करावी लागते. ती परिस्थिती सिद्ध करण्यासाठीचे जे निकष आहेत, ते १९९२चे आहेत. त्याच्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. आरक्षणासाठी दुर्गम परिस्थितीत सिद्ध करावी लागते. त्याचे निकष अवघड आहेत. तशी परिस्थिती आज नाही. त्यामुळे १९९२च्या निकषामध्ये बदल करावे लागतील, असा ठराव यावेळी घेण्यात आला. हा मुद्दा लोकसभेत मांडण्याचे खासदारांनी मान्य केले.
दुसऱ्या ठरावाबाबत संभाजीराजेंनी सांगितले, सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाचे आरक्षण ज्या मुद्द्यांमुळे टिकले नाही. त्यात मराठा समाजाचे नोकऱ्यांमधील प्रमाण बघितले गेले. मुळात हे प्रमाण तपासत असताना १०० टक्क्यांच्या अनुषंगाने तपासले पाहिजे होते. केवळ खुल्या वर्गाचा निकष ठेवून तपासले गेल्याने टक्केवारी जास्त दिसून आली. टक्केवारी मोजण्याची पद्धत चुकीची असल्याचं संभाजीराजेंनी सांगितले. सरकारने क्युरेटिव्ह पिटीशनच्या माध्यमातून कोर्टामध्ये हा मुद्दा मांडावा, असा ठराव घेण्यात आला.
केंद्र सरकारला इशारा
पंतप्रधान, केंद्र सरकारने या विषयात लक्ष घालणे गरजेचे आहे. ठरावाप्रमाणे केंद्राने लक्ष दिले नाही तर गाठ आमच्याशी आहे. आम्ही दिल्लीत मुक्काम करु.. हजारो लोक दिल्लीत येतील, असा इशारा संभाजीराजेंनी दिला. दरम्यान, काही खासदारांनी बैठकीबद्दल माहिती नसल्याचे सांगितले, केवळ मेल आला, फोन आला नाही, अशा तक्रारी करण्यात आल्या. त्यावर संभाजीराजेंनी संताप व्यक्त करुन अनेकांना फोन केल्याचं नमूद केले . आपण इथे राजकारण करायला आलेलो नाही, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीसाठी उपस्थित असलेले खासदार
१) धैर्यशील माने, शिवसेना (शिंदे गट) हातकणंगले, लोकसभा मतदारसंघ
२) श्रीकांत शिंदे, शिवसेना (शिंदे गट) कल्याण डोंबिवली, लोकसभा मतदारसंघ
३) धनंजय महाडीक, भाजप (राज्यसभा), महाराष्ट्र
४) संजय मंडलिक, शिवसेना (शिंदे गट) लोकसभा, कोल्हापूर
५) हेमंत गोडसे, शिवसेना (शिंदे गट) लोकसभा मतदारसंघ, नाशिक
६) ओमराजे निंबाळकर, शिवसेना (ठाकरे गट) धाराशिव, लोकसभा मतदारसंघ
७) उदयनराजे भोसले , राज्यसभा (भाजप) महाराष्ट्र
८ )राहुल शेवाळे, लोकसभा मतदारसंघ, दक्षिण मध्य मुंबई (शिवसेना शिंदे गट)
०९) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार , दिंडोरी लोकसभा मतदारासंघ (भाजप)
१०) प्रतापराव जाधव, खासदार (शिवसेना शिंदे गट) बुलढाणा मतदारसंघ
११) रावसाहेब दानवे ,(भाजप) जालना लोकसभा मतदारसंघ
१२) सुधाकर शृंगारे, (भाजप) लातूर लोकसभा
१३) गजानन कीर्तीकर, शिवसेना (शिंदे गट) – उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघ
१४) भावना गवळी, शिवसेना (शिंदे गट)- यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ
१५) रणजित निंबाळकर, भाजप – माढा लोकसभा मतदारसंघ
१६) कपिल पाटील, भाजप – भिवंडी लोकसभा मतदार संघ
१७) प्रतापराव चिखलीकर, (भाजप) नांदेड लोकसभा मतदार संघ
१८) प्रफुल पटेल, राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यसभा महाराष्ट्र
१९) कृपाल तुमाने, शिवसेना (शिंदे गट) – लोकसभा
२०) उन्मेष पाटील, भाजप – लोकसभा
२१ ) सदाशिव लोखंडे
खा . उदयन राजे काय म्हणाले ?
दरम्यान या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना छत्रपती उदयनराजे म्हणाले , ”गेली 40 वर्षे लोकांना न्याय मिळाला नाही त्यामुळे हा उद्रेक झाला आहे, लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना न्याय देणे हे आमचे कामच आहे. आज राजकारण सोडून समाजाला न्याय मिळाला पाहिजे, हे प्रत्येकाला वाटत आहे. मराठा समाजाची भावना असेल तर त्यात चुकीचे काय ? असा प्रश्न करून उदयनराजे म्हणाले, ”मंडल आयोगाची स्थापना झाली त्यावेळीच हा प्रश्न सोडवायला हवा होता, कोणी सोडविला नाही? याच्या खोलात जायचे नाही. पण त्यावेळी हा प्रश्न सुटला असता तर जातिजातीत तेढ निर्माण झालेली पाहायला मिळाले नसते.
या बैठकीला अनुपस्थितीत असणाऱ्या खसदारांविषयी विचारले असते उदयनराजे म्हणाले, ”काही खासदाराना काही मिटिंग असतील, कार्यक्रम असतील त्यामुळे ते आले नाहीत त्यामुळे त्यांचा पाठिंबा नाही असा अर्थ कोणी काढू नका.” तसेच, दहा वर्षांनंतर जातीनिहाय जनजणना झाली पाहिजे ती करावी. त्याची श्वेतपत्रिका काढा हा प्रश्न आपोआप संपेल. या पलीकडे तुमच्याकडे काहीही पर्याय नाही.” असेही त्यांनी नमूद केले.
”मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे सर्वांचं मत आहे. गेली चाळीस वर्षे लोटली तरी मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, जरांगे पाटलांची हीच भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभाव हा विचार होता, त्यानुसार सर्वांना वागणूक मिळाली पाहिजे. मराठा समाजाची वेगळी अपेक्षा नाही. पण, चूक कोणाची हे काढण्यापेक्षा न्याय मिळाला पाहिजे या मताशी आम्ही सर्वजण ठाम आहोत.” लोकांकडे मतदार म्हणून नको तर माणूस म्हणूंन बघा ते तुमच्या निश्चित पाठीशी उभी राहतील. जातपातीचे राजकारण असेच सुरू राहीले, तर ही लोकशाही समपुष्टात येईल व देशाचे तुकडे होतील.” असंही यावेळी उदयनराजे यांनी म्हटले आहे.