SharadPawarNewsUpdate : त्यांच्याकडे दुर्लक्ष करा , त्यांचा फारसा विचार करण्याची गरज नाही, शरद पवारांनी केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन …

पुणे : काल राष्ट्रवादीच्या फुटीर गटाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावार टीका केल्यानंतर शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे . दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर गेलेल्यांकडून पुन्हा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत, त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही. लोकांकडे गेल्यानंतर प्रश्न विचारतील म्हणून आपल्यावर हल्ले करा आणि मुळ मुद्यांवर दुर्लक्ष करा, असा प्रकार सुरु आहे. त्यामुळे फारसा विचार करण्याची गरज नाही, आम्ही विचारांशी बांधिल आहोत, संधीसाधू नाही, अशा मोजक्याच शब्दात अजित पवार यांचा विषय संपवला.
दरम्यान अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या शिबिरात बोलताना शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीसाठी चार जागाही घोषित केल्या आहेत. यामुळे आरोपांना आणि अजित पवार गटाच्या भूमिकेवर शरद पवार काय उत्तर देणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. शरद पवार यांनी पुण्यात बोलताना अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तुमचा कार्यक्रम काय होता, तुम्ही कुणाचं नेतृत्व स्वीकारलं होतं आणि आता कुणासोबत गेला आहात, अशी प्रश्न लोक विचारणार, म्हणून आमच्यावर हल्ला करत आहेत, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
जे काही घडले त्यामुळे संघटना स्वच्छ झाली…
यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सामान्य लोकांमध्ये आपली भूमिका मांडण्याची गरज आहे. भीती बाळगण्याचे काही कारण नाही. जे काही घडलं त्याची चिंता करण्याची गरज नाही, उलट संघटना स्वच्छ झाली नवीन लोकांना संधी मिळाली आहे. विधानसभा जाहीर होतील तेव्हा राष्ट्रवादीची नवी फळी तयार होणार आहे, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. नेतृत्वाची नवी फळी तयार करण्याची तुमच्यात क्षमता आहे. काही लोकानी नवे प्रश्न तयार केले आहेत, टीका केली. त्याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज नाही. जेव्हा लोकांमध्ये जाणार तेव्हा काही प्रश्न लोकं विचारणार म्हणून ते आज बोलत आहेत. सत्ता येते आणि जाते, सामान्य लोकांचा पाठिंबा महत्वाचा आहे. आम्ही संधीसाधू नाहीत, हे तुम्ही इथं येऊन दाखवून दिलंत त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्ही कुणाच्या तिकिटावर निवडून आला, तुमची खूण काय होती, तुम्ही कोणाचा फोटो वापरला, तुमचा कार्यक्रम काय होता आणि आज तुम्ही कुठे गेलात? याचा विचार सामान्य माणूस करत असतो.
कार्यकर्त्यांना दिला हा संदेश…
“मला याआधीही काही आमदार सोडून गेले होते. तेव्हा आम्ही लोकांमध्ये गेलो आणि नवीन पीढी उभा केली. तेव्हा सोडून गेलेल्या ६० आमदारांपैकी ५१ ते ५२ जणांचा पराभव झाला होता. त्यामुळे आताही कोणी सोडून गेलं, याची चिंता करण्याची गरज नाही. कारण सामान्य लोकांमध्ये जाऊन जो आपली भूमिका मांडण्यात यशस्वी होतो, त्याच्यामागे लोक उभे राहतात. ती अवस्था पुन्हा एकदा नक्की महाराष्ट्रात पुन्हा बघायला मिळेल. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्याशी याबाबत सविस्तरपणे बोलणार आहे.
दरम्यान, लोकसभेची निवडणूक ३ ते ४ महिन्यांवर आली आहे. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहे. त्यामुळे जे मतदारसंघ आपण ठरवले आहेत, त्यासाठी तयारी करून ही जागा आम्ही घेणारच असा निर्धार करून तुम्ही पुढची पावलं टाकली पाहिजे, असंही यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं आहे.