देवेंद्र फडणवीस म्हणाले … हा तर निवडणुकीतील जुमला , संविधानाचा मूळ गाभा कुणालाच बदलता येत नाही !!

नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत शिवतीर्थावर आयोजित ‘संविधान सन्मान महासभे’त बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तसेच सध्याचे सरकार संविधान बदलू इच्छित आहे, असा आरोप केला होता त्यावर आपली प्रतिक्रिया देताना भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचाही बाप संविधान बदलू शकणार नाही. संविधानाचा मूळ गाभा कुणालाच बदलता येत नाही, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
प्रकाश आंबेडकरांच्या विधानाबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडणुका आल्या की दोन गोष्टी सुरू होतात. अर्ध्या लोकांचं ‘संविधान बदलणार’ असं सुरू होतं, तर अर्ध्या लोकांचं ‘मुंबई तोडणार’ असं चालू होतं. आता हे वारंवार ऐकावं लागेल. पण मुंबई कुणी तोडू शकत नाही, संविधान कुणी बदलू शकत नाही.”
“प्रकाश आंबेडकर हे बॅरिस्टर आहेत. त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की, भारताच्या संविधानाचा मूळ गाभा कुणालाच बदलता येत नाही. कुणालाच म्हणजे कुणालाच नाही. संविधानात तशी तरतूदच नाही. त्यामुळे संविधान बदलणार हा एक निवडणुकीतील जुमला आहे. ”
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
संविधान सन्मान महासभेत प्रकाश आंबेडकर म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीने संविधानाच्या समर्थनार्थ ही चर्चा सुरू केली आहे. काँग्रेस पक्षानेही येत्या कालावधीत दुसऱ्या राज्यात संविधानाची चर्चा सुरू करावी. सार्वजानिक सभा घ्याव्यात. काहीजण संविधान बदलू इच्छित आहेत. त्यांना माझं विचारणं आहे की, तुम्हाला संविधान का बदलायचं आहे? संविधान बदलण्याच्या आगोदर आपण ठरवतो की नवीन काय येणार आहे. पण एवढंच सांगितलं जातंय की हे संविधान आता जुनं झालंय. आता न चालण्यासारखं झालंय, म्हणून बदललं पाहिजे. त्यामुळे याचा विचार करणं आवश्यक आहे.