MaharashtraNewsUpdate : अखेर पंढरपुरातील सकल मराठा सामाजाचा शासकीय महापूजेला होणारा विरोध मावळला…

मुंबई : काहीही झाले तरी कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ दिली जाणार नाही आस इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला होता. त्यामुळे नाविन समस्या निर्माण झाली होती. मात्र आता हा मार्ग मोकळा झाला असल्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक विठ्ठल रखुमाईची महापूजा करणार असल्याचे वृत्त आहे.
जिल्हा प्रशासनाच्या दाव्यानुसार सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून समाजाच्या पाचही मागणी मान्य केल्या आहेत. त्यानंतर मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले. फडणवीस दाम्पत्य कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रशासन व सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी कुणबी जातीच्या नोंदी वेगाने शोधणे, मराठा भवन बांधणे, सारथीचे उपकेंद्र सुरू करणे, मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणे आणि मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांचा वेळ मिळणे या पाच मागण्या केल्या. त्यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व मागण्या तात्काळ मान्य केल्याची माहिती आहे.
दरम्यान सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजेला केलेला विरोध व आंदोलन मागे घेतले. तसेच शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे समाजाच्या वतीने सांगण्यात आले. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच केले होते. त्यानंतर अवघ्या काही तासातच हा तिढा सुटल्याचं पाहायला मिळाले.