SharadPawarViralCasteCertificate : शरद पवारांचा ओबीसा नोंद असलेला व्हायरल दाखला, काय आहे सत्य ?

मुंबई : एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असताना दुसरीकडे त्यावरून सुरू असलेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही. या प्रश्नी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा एक दाखला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या दाखल्यात शरद पवारांचा प्रवर्ग हा ओबीसी असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
शरद पवारांनी राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देत मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे आणि ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली आहे. अशात शरद पवारांनी आधीच कुणबी दाखला काढला असून या आधीपासून ते ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान शरद पवारांचा व्हायरल होत असलेला तो दाखला फेक असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. हे कुणीतरी जाणूनबुजून करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. शरद पवारांचा ओबीसी उल्लेख असलेला दाखला जाणूनबुजून संघ आणि भाजप व्हायरल करत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलेला आहे.
शरद पवारांचा मराठा असा उल्लेख असलेला दाखला संभाजी ब्रिगेडने पुढे आणला आहे. पवारांच्या शाळेतील दाखल्यावर मराठा असा उल्लेख असताना काही जण जाणूनबुजून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवारांच्या शाळेच्या दाखल्यावर ओबीसीचा उल्लेख असलेला दाखला व्हायरल केला जात आहे. जे जिजाऊचे वंशज असल्याचं सांगतात त्यांनी हे केले आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या माध्यमातून ओबीसी आणि मराठा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर यांनी केला आहे.