Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaElectionUpdate : लोकसभेची ‘सेमी फायनल’! ५ राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, मतमोजणी एकाच दिवशी

Spread the love

राजस्थानमध्ये २३, मध्य प्रदेशात १७ , छत्तीसगडमध्ये ७  आणि १७ , तेलंगणामध्ये ३०  नोव्हेंबरला मतदान, ३  डिसेंबरला निकाल.

नवी दिल्ली :  मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची अखेर निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये या ५ राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. छत्तीसगडमध्ये २ टप्प्यात, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणामध्ये १ टप्प्यात मतदान होणार आहे. विशेष म्हणजे या ५ राज्यांच्या निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबर २०२३ रोजी लागणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं की, निवडणूक आयोगाने सर्व ५ राज्यांचा दौरा केला. सरकारी संस्था, राज्य सरकार यांच्यासोबत बैठक घेतली. मिझारोमचा कार्यकाळ २०२३ रोजी संपतोय तर इतर ४ राज्यांचा कार्यकाळ जानेवारी २०२४ मध्ये संपणार आहे. या ५ राज्यात ६७९ विधानसभा जागा आहेत. त्यात १६.१४ कोटीहून अधिक मतदार आहेत. यामध्ये ८.२ कोटी पुरुष मतदार तर ७.८ कोटी महिला मतदार आहेत. या राज्यांमध्ये ६० लाख असे मतदार आहेत जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.

त्याचसोबत १७ ऑक्टोबरपासून मतदार यादी जारी केली जाईल. १७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही मतदाराला मतदार यादीत काही बदल करायचे असतील तर करू शकतात. या ५ राज्यात १.७७ लाख पोलिंग बूथ बनवले जातील. मतदान केंद्र २ किमी अंतरातच असतील. आदिवासी भागात विशेष मतदान केंद्र उभारली जातील.

असा होणार निवडणूक कार्यक्रम

मध्य प्रदेश
एकूण जागा – २३०
मतदान तारीख – ७ नोव्हेंबर २०२३

राजस्थान
एकूण जागा – २००
मतदान तारीख – २३ नोव्हेंबर २०२३

छत्तीसगड
एकूण जागा – ९०
मतदान तारीख –
पहिला टप्पा – ७ नोव्हेंबर
दुसरा टप्पा – १७ नोव्हेंबर

तेलंगणा
एकूण जागा – ११९
मतदान तारीख – ३० नोव्हेंबर

मिझोराम
एकूण जागा – ४०
मतदान तारीख – ७ नोव्हेंबर २०२३

भाजपच्या निरोपाची घोषणा : मल्लिकार्जुन खरगे

या पाच राज्याच्या निवडणूक घोषित होताच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, भाजप आणि मित्रपक्षांच्याही साथ सोडण्याची घोषणा झाली आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये काँग्रेस पक्ष जोरदारपणे लोकांपर्यंत पोहोचेल. लोककल्याण, सामाजिक न्याय आणि प्रगतीशील विकास ही काँग्रेस पक्षाची हमी आहे.

भाजप सर्व राज्यात बहुमताने सरकार स्थापन करेल: जेपी नड्डा

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी निवडणूक आयोगामार्फत विधानसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सर्व राज्यांमध्ये प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल. येत्या पाच वर्षात जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही निर्धाराने काम करू.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!