ViralNewsUpdate : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व्हायरल ध्वनी फितीने खळबळ
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची, पत्रकारांनी विरोधात लिहू नये म्हणून त्यांना चहाला बोलवा असे म्हटल्यानंतर त्यांच्या वक्तव्याची कथित ध्वनी फित चांगलीच व्हायरल होत आहे. यावरून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. बावनकुळे आज नाशिक दौऱ्यावर असून काल नगर दौऱ्यात असताना कार्यकर्त्यांना हा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बावनकुळे यांच्यावर निशाना साधना आहे. बावनकुळेंची विद्वत्ता यातून पुढे आली असल्याचे ते म्हणाले. दरम्यान यावर आता बावनकुळे यांनी प्रतिक्रीया देताना मी म्हटले आहे की , मी फक्त पत्रकारांशी चांगले वागा असा सल्ला देत होतो.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क रहावं. पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, त्यांना ढाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्याची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हायरल ऑडिओ क्लिपवर स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असा दावा त्यांनी केला आहे. ते बोलताना म्हणाले की, ‘चुकीच्या चर्चा, बातम्या येऊ नयेत. एखादी घटना घडली नाही. त्या घटनेच्या बातम्या येतात. छोटे-छोटे वेब पोर्टल अशा बातम्या चालवतात. कारण त्यांना माहिती पुर्ण नसते.’
बावनकुळे नेमकं काय म्हणाले आहेत?
“ज्या बुथवर तुम्ही काम कराल, तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले कोण आहेत, पोर्टल वाले कोण आहेत, प्रिंट मीडियावाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतो, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत, त्यांची यादी तयार करा, आपल्या बुथवर निगेटिव्हिटी होऊ द्यायची नाही, आपल्याविरुद्ध लिहू नये, विरोधात काही येणार नाही, याची काळजी घ्या, यात एक-दोन पोर्टल वाले, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक वाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे, हे समजलं असेल, त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच.” “मिशन महाविजय 2024 पर्यंत बुथ संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही, याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत याची काळजी घ्या.”