MaharashtraPoliticalUpdate : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर आज सुनावणी
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर १४ सप्टेंबर रोजी घेतलेल्या सुनावणीनंतर आता पुढची सुनावणी आजपासून सुरू होत आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी या सुनावणीला हजर राहण्यासाठी ठाकरे गटाच्या १४ तर शिंदे गटाच्या ३९ आमदारांना नोटीस पाठविली असून, दुपारी ३ पासून विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी पार पडणार आहे.
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे १४ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या याचिका मिळाल्या नसल्याचा दावा करण्यात आला होता. यामुळे त्यांना या याचिकांचा अभ्यास करण्याचा वेळ देताना अध्यक्षांनी १७ दिवस पुढे ही सुनावणीची तारीख निश्चित केली होती. मात्र, त्यावरील याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना खडसावल्याने सोमवारी तातडीने सुनावणीला सुरुवात करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी यांनी नोटिसा मिळाल्या असून, आम्ही आमच्या वकिलांसह या सुनावणीसाठी दुपारी ३ वाजल्यापासून हजर राहणार आहोत, असे स्पष्ट केले.
या सुनावणीत मूळ पक्ष कुणाचा यावरच भर राहण्याची शक्यता आहे. या युक्तिवादात न्यायालयाने सूचित केल्याप्रमाणे ठाकरे गटाकडून जून २०२२ला अस्तित्वात असलेला पक्ष आणि प्रतोद हा मुद्दाच लावून धरला जाणार आहे तर शिंदे गटाकडे विधिमंडळात बहुमत असलेला पक्ष हा मुद्दा असेल.