MarathaReservationUpdate : मराठवाड्यातील मराठा , कुणबी अशा वादात मराठा क्रांती मोर्चाने व्यक्त केली भूमिका …

छत्रपती संभाजीनगर : जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांनी सुरु केलेले आंदोलन मराठवाड्यातील मराठा समाजाला निजामकाळात असलेले आरक्षण देण्यात यावे. कुणबी म्हणून या आरक्षणाची तरतूद करावी यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. मात्र ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. तर दुसरीकडे राज्यातील वेगवेगळ्या मराठा संघटनांकडूनही मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध होताना दिसत आहे. सोलापुरातील मराठा आक्रोश मोर्च्यातील समन्वयकांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केला आहे. त्यामुळे या वादाला आता मराठा विरुद्ध कुणबी असं स्वरुप मिळतंय की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मनोज जरांगे यांनी त्यांच्या उपोषणाच्या दरम्यान मराठवाड्यातील मराठ्यांचं काय असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला. तसेच इतर ठिकाणच्या मराठा समाजाला अनेक सोईसुविधा मिळत असताना मराठवाड्यातील मराठा मात्र त्यापासून वंचित असल्याचं वक्तव्यही केलं. नेमका त्यावर आता आक्षेप घेतला जात असून पहिली प्रतिक्रिया सोलापुरातून आली आहे.
मनोज जरांगे यांचे सुरु असलेले उपोषण हे केवळ एका प्रांतापुरते मर्यादित असून त्याचा फायदा राज्यातील इतर भागातल्या मराठा समाज बांधवाना होणार नाही असं सोलापूर मराठा आक्रोश मोर्च्याच्या समन्वयकांनी सांगितलं. सोलापुरातील मराठा आक्रोश मोर्चाचे समन्वयक किरण पवार आणि अनंत जाधव म्हणाले की, “हैद्राबाद संस्थानच्या मराठवाड्यातील मराठा समाज बांधवची नोंद ही कुणबी अशी होती. त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीने केवळ मराठवाड्यातील कुणबी मराठा समाजाला फायदा होईल. इतरांनी का म्हणून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा.
राजेंद्र कोंढरे यांच्यासारख्यांकडे कुणबी मराठा प्रमाणपत्र आहे. ते कुणबी म्हणून ओबीसीतून मिळणारे लाभ देखील घेतात. तसेच मराठा समाजासाठी असलेल्या सारथी आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळचा देखील लाभ घेतात असा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या ताटातील काहीही आम्हाला देत नाही. मात्र आमच्या ताटातील घेतात असं ते म्हणाले.
सोलापुरातील मराठा आक्रोश मोर्चाचे समन्वयक किरण पवार आणि अनंत जाधव म्हणाले की, “शासनाने हैद्राबादला कमिटी पाठवली आहे, मराठा समजाला आतां लक्षात येईल की आपण ज्या आंदोलनाला पाठिंबा देतोय त्याचा फायदा केवळ मराठवाड्यातील लोकांना होईल, आपल्याला नाही. मनोज जरांगे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न मांडावा, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. ते जर केवळ मराठवाड्यापुरते बोलणार असतील तर आमचा त्यांना पाठिंबा नसेल.