MaharashtraPoliticalUpdate : शिंदे – पवारांच्या सत्तेतील सहभागाविषयी माहिती नाही , पंकजा मुंडे व्यक्त केली आपली मते …

मुंबई : भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी सध्या राज्यभर ‘शिवशक्ती परिक्रमा’ सुरू केली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या विविध देवस्थानांना भेटी देत आहेत. त्यांच्या या कार्यक्रमाला लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बंडखोरीबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की , “एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घेण्याच्या निर्णय प्रक्रियेत मी नसल्यामुळे मला या निर्णयाच्या गांभीर्याविषयी जास्त माहीत नाही. पण एकनाथ शिंदे जेव्हा भाजपाबरोबर आले, तेव्हा ती भाजपाची गरज होती, हे स्पष्ट आहे. कारण भाजपाला सरकारमध्ये यायचं होतं. पण भाजपा सत्तेत असताना आता अजितदादाही सरकारमध्ये सामील झाले. मग त्याच्यामागे काय अजेंडा असू शकतो, हे कदाचित केंद्रीय पातळीवरून सांगता येईल.
पुढे काय होईल? हे तुम्हीच पाहा…
लोकसभेला विरोधकच नसला पाहिजे, अशी राजकारणाची पद्धत आहे. अजित पवारांना सत्तेत घेण्यामागे तोच प्रयत्न असावा. विरोधक कमजोर व्हावा, तसाच प्रयत्न असेल. पण पुढे काय होईल? हे तुम्हीच पाहा. यावर मी काही सांगू शकत नाही” . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यापैकी तुम्हाला कोणता चेहरा जास्त आश्वासक वाटतो? या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “त्यांच्याकडे पाहून मला सध्या फार काही वाटत नाही. मला सगळेजण खूप तणावात दिसतात. कारण सत्तेत आल्यापासून त्यांच्यामागे कोणते ना कोणते प्रश्न सुरू आहेत. महाराष्ट्रात मध्यंतरी पूर आला होता, आता पाणी नाही. अशा समस्या सकारात्मक पद्धतीने सोडवताना मी त्यांना पाहिलं नाही. त्यामुळे त्यावर मी काही टिप्पणी करू शकत नाही.”
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, “मी देवेंद्र फडणवीसांबरोबर काम केलं आहे. त्यांच्या कामाचा झपाटा मी त्यावेळी पाहिला आहे. अजित पवारांबरोबर काम करण्याचा कधी योग आला नाही. पण नोकरशाहीवर त्यांचा बराच प्रभाव आहे, हे मी प्रसारमाध्यमांतून पाहिलं आहे. ते स्पष्ट बोलतात. एकनाथ शिंदेंबाबत बोलायचं झालं, तर त्यांचे कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत. ते एकदम शांत स्वभावाचे आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना लळा लावलाय, हे मला ऐकून माहीत आहे.”
पंकजा मुंडे यांनी अलीकडेच राजकारणातून ब्रेक घेतला होता. दोन महिन्यांची सुट्टी घेतल्यानंतर त्यांनी राज्यभर ‘शिवशक्ती परिक्रमा’ सुरू केली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या विविध देवस्थानांना भेटी देत आहेत. त्यांच्या या कार्यक्रमाला लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. दरम्यान, त्यांनी ‘एबीपी माझा’ला मुलाखत देताना सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं.