Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SambhajiBhideNewsUpdate : करमचंद नव्हे मुस्लीम जमीनदार महात्मा गांधी यांचे खरे वडील, संभाजी भिडे पुन्हा बरळले , विधानसभेत अटकेची मागणी

Spread the love

अमरावती : नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेच्या केंद्रस्थानी असलेले संभाजी भिडे यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. यावरून विरोधकांनी विधिमंडळ अधिवेशनात भिडेच्या अटकेची मागणी केली आहे. आता, महात्मा गांधींबद्दल बोलताना भिडे चांगलेच बरळले असून त्यांच्या या विधानाबद्दल सर्वत्र निषेध होत आहे. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत, असा खळबळजनक दावा भिंडेंनी अमरावती दौऱ्यात बोलताना केला.

संभाजी भिडेची यापूर्वी चंद्रपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, नियोजित बैठकस्थळी आंबेडकरवादी संघटनांनी आणि काहींनी विरोध केला होता. मात्र पोलिसांनी वेळीच सतर्क होत या विरोधकांना ताब्यात घेतल्याने वाद टळला. त्यानंतर, संभाजी भिडे गुरुवारी अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी, संघटनात्मक कार्यक्रमात बोलताना भिडे यांनी महात्मा गांधींजींबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडे यांच्‍या सभेचे आयोजन करण्‍यात आले होते.

महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लीम जमीनदार

महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्‍यांचे खरे वडील आहेत.  संभाजी भिडे म्हणाले, महात्मा गांधींचे जे वडील म्हणवले जातात ते करमचंद गांधी हे एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून करमचंद गांधी पळून गेले होते. त्यामुळे चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद गांधी यांची पत्नी म्हणजेच महात्मा गांधीजींच्या आईला पळवून घरी आणले.

गांधींचे शिक्षणही जमीनदाराने केले

संभाजी भिडे म्हणाले, महात्मा गांधींच्या आईला पळवून आणल्यानंतर जमीनदाराने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे महात्मा गांधीजींचे खरे वडील नसून ते त्या मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहे. एवढेच नव्हे तर, महात्मा गांधीजींचे शिक्षण आणि सांभाळ त्याच मुस्लिम जमीनदाराने केला. याबाबत माझ्याकडे पुरावे देखील आहे, असा दावाही संभाजी भिडे यांनी केला.

सर्वधर्मसमभावाचा उपदेश नकोच

कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी हिंदुत्वावरदेखील भाष्य केले. संभाजी भिडे म्हणाले, जगाच्या पाठीवर हिंदुस्तान एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे. हिंदूंची कीर्ती आणि शौर्य अफाट आहे. मात्र, सध्या हिंदू स्वतःच कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि धर्म विसरला आहे. त्यामुळे हिंदुस्थानाची आणि हिंदूंची अधोगती होत आहे. तसेच, देशामध्‍ये सर्वधर्मसमभावाचा उपदेश नकोच. अशा प्रकारचा उपदेश देणाऱ्या नेत्यांना राजकारणातून हद्दपार करावे, असे आवाहनही संभाजी भिडे यांनी केले.

आंबेडकरवादी संघटनांचा कार्यक्रमाला विरोध

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या या कार्यक्रमाला भीम आर्मी, भीम ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे विरोध करण्यात आला होता. आंबेडकरवादी संघटनांच्या कार्यकर्त्‍यांनी अमरावतीत संभाजी भिडे यांचा कार्यक्रम होऊ नये म्हणून आंदोलन केले. काही ठिकाणी पोस्‍टरही फाडण्‍यात आले होते.

विधानसभेत पडसाद

दरम्यान, संभाजी भिडेंच्या या वादग्रस्त विधानाचे आज विधानसभेत पडसाद उमटले आहेत. विधानसभेत आमदार बाळासाहेब थोरात यांनी संभाजी भिडेंचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतात, त्यांना पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी ते वारंवार अशी विधाने करतात? आम्ही सभागृहात संभाजी भिडेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही , असा इशारा थोरात यांनी दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!