Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NCPPoliticalCrises : पक्ष आणि पक्षाचे चिन्ह कुठेही जाऊ देणार नाही , शरद पवार भडकले , मोदींवरही टीकास्त्र …

Spread the love

मुंबई : काही लोक पक्ष आमचा आहे, घड्याळ आमचं आहे असा दावा करतात. तुम्हाला आज स्पष्ट सांगतो की खूण कुठेही जाणार नाही. चिन्ह कुठेही जाणार नाही आणि जाऊ देणार नाही. जोपर्यंत आपल्या पक्षाचा विचार सामान्य माणसाच्या अंतःकरणात आपलं स्थान आहे तोपर्यंत काहीही चिंता करायचं कारण नाही हे मी तुम्हाला सांगतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान आपलं नाणं खोटं आहे याची खात्री आमच्या मित्रांना आहे. त्यामुळेच त्यांच्या बैठकीत आणि मेळाव्यात माझा मोठा फोटो लावण्यात आला असं वक्तव्य करत शरद पवार यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

त्यांचं नाणं खोटं , म्हणून माझ्या फोटोचा वापर …

अजित पवार यांनी आज भाषण करत असताना निवृत्तीच्या वयाची आठवण शरद पवार यांना करुन दिली. मात्र शांत आणि संयत भाषण करत शरद पवार यांनी अजित पवार यांचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार आणि त्यांच्यासह गेलेले आमदार यांच्यावर टीका केली. “आज काही लोकांनी भाषणं केली. बोलताना सांगत होते शरद पवार आमचे गुरु आहेत. आमच्या मित्रांचा मेळावा झाला त्यात फोटो पाहिले का? सगळ्यात मोठा फोटो होता माझा. मुंबईत पोस्टर लावली की फोटो माझा. त्यांना माहित आहे आपले नाणे चालणार नाही. त्यामुळे चालणारे नाणे घेतले पाहिजे. त्यांचे नाणे खरे नाही ते खणकन वाजणार नाही अडचण नको म्हणून त्यांनी माझा फोटो वापरला आहे. पांडुरंगाच्या दर्शनाला बडवे जाऊ देत नाहीत असाही आरोप झाला. कसले बडवे? पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे असेल तर कुणी अडवत नाही. पांडुरंग म्हणायचे , गुरु म्हणायचे आणि आमच्याकडे दुर्लक्ष झाले म्हणायचे ही गंमतीची गोष्ट आहे असे मला वाटते ” असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळांनाही टोला

एक तर आपले सहकारी आहेत ते म्हणाले हे काही चाललं आहे ते बरोबर नाही. मी काय चाललं आहे ते बघून येतो आणि तुम्हाला कळवतो असं मला सांगितलं. त्यानंतर मला त्यांनी शपथ घेतल्याचाच फोन केला. असं म्हणत शरद पवार यांनी छगन भुजबळांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रात काही लोकांनी बाजूला जायची भूमिका घेतली. माझी तक्रार नाही पण दुःख आहे. कारण लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे. कार्यकर्त्यांनी अपार मेहनत केली होती. जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही त्याच विचारांच्या पंक्तीला जाऊन बसणं योग्य नाही. एवढंच मला आज सांगायचं आहे. सध्या दिसतंय काय? नाशिकला पक्षाच्या ऑफिसमध्ये काही गडबड झाली. ऑफिस कुणाचं तर राष्ट्रवादीचं. उद्या कुणीही उठलं आणि मी काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे असं सांगितलं तर याला काही अर्थ आहे? ही गोष्ट लोकशाहीत योग्य आहे का? नाही पण ती झाली. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आपल्याला आणखी पुढे जायचं आहे…

आज आपल्याला आणखी पुढे जायचं आहे. संकटं खूप आहेत, ज्यांची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही अशा लोकांकडे देशाची सूत्रं आहे. ज्यांच्या हाती सूत्रं आहेत त्यांच्यासमोर त्यांच्या सहकाऱ्यांनाही बोलण्यास मर्यादा आहेत. मी मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात होतो, नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात होतो. या सगळ्यांची कामाची पद्धत पाहिली. एखादी भूमिका योग्य नसेल तर चर्चा व्हायची. संवाद व्हायचा, आज तो संवाद संपला आहे. मी महाराष्ट्राचा चारवेळा मुख्यमंत्री झालो. निर्णय घेतल्यानंतर सामान्य माणसांना काय वाटतं आहे हे ऐकून घ्यावं लागतं. आज देशात संवाद तुटला आहे. आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षात नाहीत. आम्ही लोकांमध्ये आहोत. त्यामुळेच कधीकाळी सामान्य माणसाची जी स्थिती समजते त्यातून मार्ग काढण्याची इच्छा असते पण राज्यकर्त्यांचा संवाद नसेल तर या गोष्टीतून मार्ग काढता येत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

आज देशामध्ये कमालीची अस्वस्थता जनतेत आहे. दुसऱ्या बाजूला आम्ही लोकांनी प्रयत्न सुरु केले की लोकशाही टिकवायची असेल तर संवाद सुरु करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आम्ही सत्ताधारी पक्षात जे नाहीत त्यांना बरोबर घेऊन चर्चा केली. १७ आणि १८ तारखेलाही आम्ही एकत्र येत आहोत. हे जसं घडायला लागलं तशी ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली. देशाच्या पंतप्रधानांनी आठ दिवसांपूर्वी एक भाषण केलं. त्यावर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. राज्य सहकारी बँक आणि पाटबंधारे खातं याचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही गोष्टी पूर्ण हाती नसताना कमी माहितीवर करणं अपेक्षित नसतं.

राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत का घेतलं?

एकदा पंतप्रधान बारामतीत आले होते. त्यांनी सांगितलं देश कसा चालवायचा हे पवारांचं बोट धरुन मी शिकलो. निवडणुकीच्या काळात आले तेव्हा प्रचंड टीका केली. जे देशाचं नेतृत्व करतात त्यांनी बोलत असताना विशिष्ट काळजी घ्यावी लागते. जे सत्य आहे तेच सांगितलं पाहिजे. पण तेवढी धमक पंतप्रधानांनी दाखवली नाही. आपण देशाचे नेता म्हणून जनमानसासमोर बोलतो त्यावेळी मर्यादा पाळली पाहिजे. त्या मर्यादा पाळल्या जात नाही असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. बरं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी टीका केली तर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत का घेतलं? याचा अर्थ असा आहे की हे सत्ताधारी वाट्टेल ते बोलतात आणि जनमानसात एक प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असंही शरद पवार यांनी म्हटलंं आहे.

शरद पवार यांच्यासोबत १३ आमदार

अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाकडून आज मुंबईत मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. अजित पवार गटाला जवळपास ४०-४१ आमदारांचा पाठिंबा आहे. तर शरद पवार गटाला एकूण १३ आमदारांचा पाठिंबा आहे. मुंबईतील वायबी चव्हाण सेंटर सभागृहात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण १३ विधानसभा आमदार, ३ विधानपरिषद आमदार आणि ५ खासदार उपस्थित आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्याकडेच विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ अधिक असल्याचं दिसलं आहे.

शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या विधानसभा आमदारांमध्ये अनिल देशमुख, रोहित पवार, राजेंद्र शिंगणे, अशोक पवार, किरण लहमटे, प्राजक्ता तनपुरे, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड, चेतन विठ्ठल तुपे, जयंत पाटील, राजेश टोपे, संदीप क्षीरसागर आणि देवेंद्र भुयार यांचा समावेश आहे. तर श्रीनिवास पाटील (लोकसभा), सुप्रिया सुळे (लोकसभा), अमोल कोल्हे (लोकसभा), फौजिया खान (राज्यसभा) आणि वंदना चव्हाण (राज्यसभा) या खासदारांसह शशिकांत शिंदे, बाबाजानी दुराणी आणि एकनाथ खडसे या विधानसभा आमदारांचा पवारांना पाठिंबा आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!