NCPCrisesNewsUpdate : अजित पवार गटकडून राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर निवडणूक आयोगाकडे दावा ..

नवी दिल्ली : शिवसेनेचे बंडखोर नेते विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवार गटानेही राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावावर दावा करत निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले.
राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे आता राष्ट्रवादीतही अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. अजित पवार गटाने आपलाच मूळ पक्ष असल्याचे सांगत पक्षचिन्ह आणि पक्षनावावर दावा केला आहे.
अजित पवारांना अध्यक्ष करा ..
एएनआयला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून २०२३ तारीख असलेले पत्र निवडणूक आयोगाला ५ जुलै रोजी प्राप्त झाले आहे. यामध्ये १९६८ च्या पॅरा १५ अंतर्गत एक याचिका प्राप्त झाली आहे. ३० खासदार आमदार आणि एमएलसी यांची ४० प्रतिज्ञापत्रे या याचिकेतून करण्यात आली आहेत. तसंच, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा ठरावही निवडणूक आयोगाला प्राप्त झाला आहे.
दरम्यान, अजित पवारांसह शपथ घेतलेल्या नऊ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणीही शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. “महाराष्ट्र विधानसभेच्या नऊ सदस्यांना अपात्र ठरवण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यासमोर अपात्रतेची कार्यवाही करावी”, अशी मागणी करणारे कॅव्हेट जयंत पाटील यांनी ४ जुलै रोजी निवडणूक आयोगाला पाठवले होते. हे पत्रही निवडणूक आयोगाला मिळाले आहे.