ShivsenaNewsUpdaate : देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांचे खडे बोल , … तर तुम्हाला शवासन करावे लागेल !!

मुंबई : पाटण्यातील विरोधकांची बैठक ही कुटुंब बचाओ मोहीम होती, अशी टीका काल देवेंद्र फडवणीस यांनी केल्यानंतर त्याला आज उद्धव ठाकरेंनी कठोर शब्दांत उत्तर दिले आहे. “देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावे लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. कोरोना काळातील मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणात ईडी छाप्यावरुन उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी नाट्यमंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांना मार्गदर्शन केले. यावेळी विरोधकांची पाटण्यातील बैठक, बीएमसीमधील कथित भ्रष्टाचार, १ जुलैचा विराट मोर्चा यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आता कोविड काळातील भ्रष्टाचार काढत आहेत. पण त्याचवेळी देशभरातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून आले. भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचे नाव सर्वोत्तम मुख्यमंत्री न आल्याने त्यांची पोटदुखी आहे. सूरज चव्हाण यांच्यावर धाड टाकली, सूरज साधा शिवसैनिक आहे. यांच्या मनात भीती बसली आहे.”
माझ्या परिवाराबाबत मी संवेदनशील…
पाटण्यातील विरोधकांची बैठक ही कुटुंब बचाव मोहीम होती, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी पाटण्याला गेलो होतो, पण लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले हे परिवार बचाव बैठकीला गेले आहेत. देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे सुद्धा व्हॉट्सॅप चॅट बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावे लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे. हा माझा परिवार आहे. सूरज, शिवसैनिक आणि हा महाराष्ट्र माझा परिवार आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी कुणी घेत असेल तर तुमचं तुम्हाला माहित. पण मी माझे कुटुंब जपणार. त्यामुळे परिवार बचाओ बोलू नका.”
हिंदुत्वावरूनही पलटवार
यासोबतच काल पाटणामध्ये झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये भाजपने मेहबूबा मुफ्ती यांच्या बाजूला उद्धव ठाकरे बसल्यानंतर भाजपने टीकेची झोड उठवली होती. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी मुद्दामून मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजूला जाऊन बसलो. देवेंद्र हे बेंबीच्या देठापासून बोंबलत होते. तुम्ही जेव्हा त्यांच्यासोबत बसलात तेव्हा तुमचं हिंदुत्व सुटले होते का? मग आमचे हिंदुत्व कसे सुटले ? माझे त्यांच्याशी बोलणे झाले की तुम्ही निर्लज्ज लोकांसोबत कसे गेलात? उमर अब्दुला यांच्याशी सुद्धा माझे बोलणे झाले.”
काय म्हणाले होते फडणवीस ?
पाटण्यात होत असलेली विरोधी पक्षांची बैठक ही परिवार वाचवण्यासाठी असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे या बैठकीचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटंबाकडे सत्ता कशी राहू शकेल यासाठी हे विरोधक एकत्र आल्याचे फडणवीस म्हणाले. मेहबुबा मुफ्तीच्या नावावर भाजपला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आज मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत जात असल्याचेही फडणवीस म्हणाले होते.