GoodNews : प्रतीक्षा संपली , राज्यात उद्यापासून पावासाला जोरदार सुरुवात …

मुंबई : प्रवासाची प्रतीक्षा आता संपत असून पुढील ४ दिवस देशातील २० राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, ओडिशा, उत्तराखंड, तेलंगणा, नागालँड, मणिपूर, मिझोराम, हिमाचल प्रदेश, कोकण आणि गोवा, विदर्भ, किनारी आंध्र प्रदेश, किनारी कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे. दरम्यान आज सकाळी मुंबईत पावसाला सुरुवात झाली असून मान्सून आज राज्यात पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने या पार्श्वाभूमीवर यलो अलर्ट जारी केला आहे. संपूर्ण मराठवाड्यात शनिवारी मध्यम तर रविवारपासून जोरदार मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.
दरम्यान मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्गात आठवडाभर जोरदार तर विदर्भातील १० जिल्ह्यांत शनिवारी, रविवारी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. नागपुरात गुरुवारी रात्री १० ते शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत ३७.४ मिमी पाऊस झाला. अमरावती २५.८, गोंदिया ३८.८, चंद्रपूर १८.८ मिमी नोंद झाली. नाशिक, नगर, पुणे, सातारा पूर्व भागात तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस पावसाचे प्रमाण कमी असले तरी रविवारपासून या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
७ दिवसांच्या विलंबानंतर देशात दाखल झालेला मान्सून २९ जूनपर्यंत मान्सून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचेल. हवामान खात्यानुसार आज मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी मुंबईत पाऊस झाला. मान्सूनने शुक्रवारी छत्तीसगडमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी आसाममध्ये पुरामुळे परिस्थिती अजूनही बिकट आहे. येथे २० जिल्ह्यांतील ५ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. पावसात दोघांना आपला जीव गमवावा लागल्याचीही बातमी आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून उशिराने देशात दाखल झाला. मात्र, आता बिपरजॉयचा प्रभाव संपल्याने सर्वच राज्यांमध्ये मान्सून वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे. आसाममधील बक्सा जिल्ह्यात पाऊस आणि पुरामुळे १३०० हून अधिक गावे पाण्याखाली गेली आहेत. सुमारे ५ लाख लोक बाधित झाले आहेत.
देशाच्या पश्चिमेकडील राज्यांबद्दल बोलायचे झाले तर, २५आणि २६ जून रोजी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय कोकण आणि गोव्यात २३ जूनपासून सुरू झालेला पाऊस २६ जूनपर्यंत सुरू राहू शकतो.