IndiaNewsUpdate : मणिपूरमधील हिंसेचा उद्रेक थांबेना , केंद्रीय मंत्र्यांचे घर पेटवले , मोदींना मौन सोडण्याची मागणी

नवी दिल्ली : मणिपूरमधील बिघडलेली परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. दरम्यान, गुरुवारी रात्री कथित जमावाने पुन्हा एकदा केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन यांच्या निवासस्थानाला लक्ष्य केले. जमावाने घराला आग लावली, त्यामुळे ते घर पूर्णपणे जळून खाक झाले. केंद्रीय मंत्र्याचे हे निवासस्थान इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील कोंगबा नंदीबाम लेकाई भागात होते. एक दिवस आधी मणिपूर सरकारमधील मंत्री नेमचा किपगेन यांच्या घराला इंफाळमध्ये आग लागली होती. मणिपूर हिंसेच्या पार्श्वभूमीवर जवळपास ५०० राजकीय आणि सामाजिक विश्लेषकांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले असून त्यात त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी मौन सोडण्याची मागणी केली आहे.
दरम्यान परराष्ट्र मंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी सांगितले की, मी सध्या अधिकृत कामासाठी केरळमध्ये आहे. सुदैवाने काल रात्री माझ्या इंफाळच्या घरी कोणीही जखमी झाले नाही. हल्लेखोरांनी पेट्रोल बॉम्ब आणले होते. माझ्या घराचा तळमजला आणि पहिला मजला भस्मसात झाला आहे. माझ्या गृहराज्यात जे घडत आहे ते पाहून खूप वाईट वाटते. मी अजूनही शांततेचे आवाहन करत राहीन. या प्रकारच्या हिंसाचारात सामील असलेले लोक पूर्णपणे अमानवीय आहेत.
गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अचानक जमाव आला आणि मंत्री रंजन सिंह यांच्या निवासस्थानी जबरदस्तीने घुसला. त्यांच्या मालमत्तेला आग लावण्याचा प्रयत्न केला. गेटवर तैनात असलेल्या गृहरक्षकांनाही गर्दी रोखता आली नाही. घटनेच्या वेळी मंत्री स्वतः किंवा त्यांचे कुटुंबीय घरात उपस्थित नव्हते. दरम्यान, हल्ला करून पेटवून देण्यात आला.
‘सर्व बाजूंनी हल्ला’
घटनेच्या वेळी मंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षा एस्कॉर्ट कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि अतिरिक्त रक्षक ड्युटीवर होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने सांगितले की, हल्ल्यादरम्यान जमावाकडून चारही बाजूंनी पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. गर्दी प्रचंड होती, त्यामुळे नियंत्रण ठेवता येत नव्हते. ३ मे पासून सुरू असलेल्या संघर्षात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
‘आधीही जमावाने हल्ला केला होता’
यापूर्वी २५ मे रोजी जमावाने केंद्रीय मंत्र्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. इम्फाळ पूर्वेतील कोंगपा नंदेई लीकाई येथे मोठा जनसमुदाय जमला होता. सुरक्षा दलांनी त्यांचा पाठलाग केला. इम्फाळ पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणी पूर्णवेळ कर्फ्यू लागू करण्यात आला होता. ४ दिवसांनी म्हणजे २९ मे रोजी जमावाने तोडफोड केली. बिष्णुपूर आणि टेंगोपालमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
इंफाळमध्ये मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान जाळण्यात आले
बुधवारी संध्याकाळी, मणिपूरचे मंत्री नेमचा किपजेन यांचे इंफाळ पश्चिम येथील सरकारी निवासस्थान समाजकंटांनी पेटवून दिले. येथे खामेनलोक गावात अनेक घरे जाळली. तामेंगलाँग जिल्ह्यातील गोबाजंग येथे अनेक जण जखमी झाले आहेत. हिंसाचारग्रस्त ईशान्येकडील राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा कर्मचारी अतिधोकादायक भागात गस्त घालत आहेत.
मणिपूर हिंसाचारावर सरकार का अपयशी ठरत आहे?
मणिपूरमध्ये ३ मेपासून संघर्ष सुरू झाला असून येथील मैतेयी समुदायाला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा देण्याच्या मागणीला विरोध केला जात आहे. ३ मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ काढल्यानंतर येथे संघर्ष सुरू झाला. गेल्या महिन्यात, आरके रंजन सिंह यांनी हिंसाचारग्रस्त ईशान्य राज्यात शांतता कशी आणता येईल यावर चर्चा करण्यासाठी मणिपूरच्या मेईतेई आणि कुकी समुदायातील लोकांच्या गटाची बैठक घेतली.
राजकीय आणि सामाजिक विश्लेषकांचे पंतप्रधान मोदींना पत्र
मणिपूर हिंसेच्या पार्श्वभूमीवर जवळपास ५०० राजकीय आणि सामाजिक विश्लेषकांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. तसेच या पत्राद्वारे शांतता राखण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती देखील या विश्लेषकांनी केली आहे. या पत्रामध्ये पंतप्रधानांनी या प्रकरणावर मौन सोडून जबाबदारी घेण्याची मागणी देखील या विश्लेषकांनी केली आहे. तसेच या हिंसेला तात्काळ थांबण्याचे आवाहन देखील या पत्राद्वारे करण्यात आले आहे. या हिंसेमुळे अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. तसेच लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं देखील या पत्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच या सर्वांमुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याचं देखील या पत्रात म्हटलं आहे.
या पत्रात म्हटलं आहे की, “अनेक प्रकारच्या अफवा पसरल्यामुळे समाजामध्ये हिंसा पसरवण्याचे काम सध्या सुरु आहे, जे अत्यंत खेदजनक आहे. वृत्तानुसार, बहुसंख्य मेईतेई समुदायाने कुकियो समाजीतील लोकांनी त्यांच्या समाजीतील महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तसेच कुकियो या समाजाकडून ‘बलात्कार करा, अत्याचार करा’ अशा घोषणा देत जमाव करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं देखील या समाजाने म्हटलं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा तपास होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे हा हिंसाचार ताबडतोब थांबवण्यात यावा अशी मागणी आम्ही करत आहोत.”