MaharashtraMonsoonUpdate : महाराष्ट्रात येत्या ४८ तासात धडकतो आहे मॉन्सून …

पुणे : उकाड्याचे आणि उन्हाचे दिवस आता संपणार असून राज्याला मान्सूनचे वेध लागलेले असून केरळमध्ये तब्बल आठ दिवस विलंबाने मोसमी वारे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात तयार झालेले बिपरजॉय चक्रीवादळ येत्या २४ तासांमध्ये आणखी उत्तरेकडे सरकणार आहे. त्यामुळे बंगालचा उपसागर ते म्यानमारपर्यंतच्या किनारपट्टीपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता कमी होणार असून येत्या ४८ तासात महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्याता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान या अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आगेकूच सुरू असून पोषक वातावरणामुळे पुढील दोन दिवसांत मान्सून गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज आहे. येत्या १३ जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार १३ जूनपर्यंत मुंबई आणि कोकणात पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही लवकरच मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान राज्यातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. राज्यातील हिंगोली, नंदूरबार, नाशिक, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने हजेरी लावली.
विशेष म्हणजे येत्या आठवडाभरातही उष्णतेचा प्रकोप कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला काही भागात झालेल्या पावसामुळं लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तरी गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज कमाल तापमान ४३ अंश आणि किमान तापमान २७ अंश राहण्याचा अंदाज आहे. यासोबतच दिवसभर जोरदार उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. तर यूपीमध्येही आज कमाल तापमान ४१ अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय देशातील बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मात्र, त्यानंतर तापमानात घट होऊ शकते. सध्या मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे अनेकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे.
या भागात जोरदार पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार केरळ, कर्नाटक, गोवा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय बिपरजॉय चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. विभागानुसार, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, लक्षद्वीप, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि अंदमान-निकोबार, सिक्कीममध्ये हलका पाऊस पडू शकतो. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी आणि हलका पाऊस सुरू राहील. बर्फवृष्टी आणि पावसामुळे आज उत्तराखंडमध्येही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील चमोली, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी येथे मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय ताशी ७० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे राजस्थानमध्येही विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील चुरू, सीकर, नागौर, जयपूर, भरतपूर येथे पावसाची शक्यता विभागाने व्यक्त केली आहे. याशिवाय ५० ते ६०किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील.