SocialMediaNewsUpdate : कमाल झाली !! ‘त्या’ जुळ्या बहिणींशी विवाह करणाऱ्या पट्ठ्याची आणखी एक कारनामा उजेडात … !!

मुंबई : व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतात ते उगीच नाही . आजारी आईची काळजी घेतल्यामुळे एका टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात पडल्यांनंतर आणि पुन्हा जुळ्या बहिणींनी त्याच्याशी विवाह केल्यामुळे अडचणीत आलेला हा तरुण पुन्हा अडचणीत आला आहे कारण त्याची पहिली पत्नी आता उजेडात आली आहे .
दरम्यान या विवाह प्रकरणाची त्वरीत चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी असे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोलापूर पोलीस अधीक्षकांना दिले असतानाच आता ही बाब उघडकीस आली आहे. माळेवाडी-अकलूज येथे एकाच वेळी दोन वधूंशी विवाह केल्याप्रकरणी वराविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, अकलूज पोलिसांनी १९६०च्या कलम ४९४ नुसार द्विभार्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. माळेवाडी अकलूज येथील हॉटेल गलांडे येथे शुक्रवारी अतुल आवताडे याने कांदिवली येथील रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणींशी एकाच वेळी विवाह करून द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले म्हणून माळेवाडी-अकलूज येथीलच राहुल फुले या युवकाने अकलूज पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. आता, याप्रकरणात नवरदेव अतुल आवताडेच्या पहिल्या बायकोची एंट्री झाली आहे. अतुलचं यापूर्वीच लग्न झालं असून त्याच्या पहिल्या बायकोने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
पोलीस चौकशीत अतुलचं याअगोदरच लग्न झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे, आता मुलीकडच्या मंडळींचे धाबे दणाणले आहेत. कारण, पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरुन मुलीकडच्या मंडळींवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. याप्रकरणात नवा ट्विस्ट आल्याने या लग्नाची चर्चा गावासह पुन्हा सोशल मीडियावरही होत आहे.
या तरुणाशी विवाह करणाऱ्या रिंकी व पिंकी या आयटी क्षेत्रात मोठ्या पगारावर नोकरी करतात. वडिलांच्या पश्चात त्या आईसोबत राहत होत्या. सहा महिन्यांपूर्वी दोघी व आईदेखील आजारी पडली. यावेळी अंधेरी येथे राहणाऱ्या अतुल आवताडे या टॅक्सी ड्रायव्हरने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. माणुसकीच्या नात्याने अतुलने तिघींची रात्रंदिवस सेवा केली. यामुळे त्यांना अतुलविषयी आपुलकी निर्माण झाली आणि त्यातून त्यांनी त्याच्याशी विवाह केला होता.