InformationUpdate : तयार राहा , उद्यापासून डिजिटल रुपया होतो आहे लाँच…

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) १ डिसेंबर रोजी डिजिटल रुपया लाँच करणार आहे. प्रायोगिक चाचणी अंतर्गत किरकोळ वापरासाठी ते सोडले जाईल. मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात, मध्यवर्ती बँकेने डिजिटल चलनाच्या किरकोळ वापरासाठी प्रायोगिक चाचणी जाहीर केली आहे. या प्रायोगिक चाचणीत सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील आठ बँकांचा सहभाग असेल. रिटेल डिजिटल रुपया डिजिटल टोकनच्या स्वरूपात असेल. आरबीआयने सांगितले की १ डिसेंबर रोजी ही चाचणी क्लोज्ड यूजर ग्रुप (CUG) मधील निवडक ठिकाणी केली जाईल. यामध्ये ग्राहक आणि बँक व्यापारी दोघांचाही समावेश असेल.
चाचणीचा पहिला टप्पा चार बँकांद्वारे – स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक – देशभरातील चार शहरांमध्ये सुरू केला जाईल, त्यानंतर आणखी चार बँका – बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी. बँक आणि कोटक महिंद्रा बँक देखील या चाचणीत सहभागी होणार आहेत. याआधी, केंद्रीय बँकेने डिजिटल रुपयाच्या घाऊक सेगमेंटची प्रायोगिक चाचणी केली आहे. डिजिटल रुपयाच्या घाऊक सेगमेंटची पहिली पायलट चाचणी १ नोव्हेंबर रोजी झाली. सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) आरबीआय त्याच मूल्यामध्ये जारी करेल ज्यामध्ये कागदी चलन आणि नाणी जारी केली जातात. ही चाचणी दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि भुवनेश्वर येथे होणार आहे.
रिटेल डिजिटल रुपयाचा वापर कसा करता येईल ?
रिटेल डिजिटल रुपयाचा वापर मोबाईल फोन आणि इतर उपकरणांवर डिजिटल वॉलेटद्वारे व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो. डिजिटल चलनातील व्यवहार व्यक्ती-ते-व्यक्ती (P2P) आणि व्यक्ती-टू-व्यापारी (P2M) यांच्यात केले जाऊ शकतात. किरकोळ डिजिटल चलन बँकांच्या माध्यमातून वितरित केले जाईल. आरबीआयच्या डिजिटल रुपी कार्यक्रमात सहभागी होणार्या बँकांनी ऑफर केलेले डिजिटल वॉलेट केवळ डिजिटल चलनात व्यवहार करू शकतात.