Shraddha Murder Case : गांजाच्या प्रभावाखाली माझ्या हातून गुन्हा घडला…
दिल्लीतील हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. त्यातच आता श्रद्धा वालकरची हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब पूनावालाने पोलिसांकडे आपल्याला गांजाचे व्यसन असल्याचा खुलासा केला आहे. १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केली तेव्हा आपण गांजाच्या प्रभावाखाली होतो असेही त्याने पोलिसांना सांगितले असल्याचे वृत्त आहे.
चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांना सांगितले की, श्रद्धा आपल्याला नेहमी गांजाचे व्यसन करत असल्याने ओरडायची. हत्येच्या दिवशी दोघांमध्ये घरखर्च तसेच मुंबईतून दिल्लीत सामान घेऊन कोण येणार यावरुन दिवसभर भांडण सुरु होते. या भांडणानंतर आफताब घराबाहेर गेला आणि गांजाचे सेवन करुन परतला. मी श्रद्धाची हत्या करणार नव्हतो, पण गांजाचे सेवन केले असल्याने त्याच्या प्रभावाखाली माझ्या हातून गुन्हा घडला असा दावा त्याने पोलिसांकडे केला आहे. श्रद्धाची १८ मे रोजी रात्री ९ ते १० दरम्यान गळा दाबून हत्या करण्यात आली. यानंतर आफताब रात्रभर मृतदेहाशेजारी बसून होता. यावेळी तो गांजाने भरलेली सिगारेट ओढत होता.
आफताबने बाथरुमच्या आतमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. आफताबने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रक्त वाहून जावे यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे करताना नळ सुरु ठेवला होता. पाण्याचे बिल जास्त असल्याने पोलिसांना संशय आला होता. आता हेच बिल या प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरणार आहे. तसेच फॉरेन्सिकला किचनमध्ये रक्ताचे डाग आढळले आहेत.
मृतदेहाचे तुकडे करण्याआधी दारु पित होतो…
हत्या केल्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे कठीण असल्याने आपण त्याचे तुकडे करण्याचे ठरवले. यासाठी आपण इंटरनेटची मदत घेतली. आपला आवडता टीव्ही शो ‘डेक्स्टर’मुळे आपल्याला मदत झाली असे त्याने सांगितले आहे. आफतबाने सर्वात आधी ३०० लीटरचा एक फ्रीज खरेदी केला. त्याने काही वर्षांपूर्वी शेफ होण्यासाठी प्रशिक्षण घेतलं होते. त्या कौशल्याचा फायदा त्याने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी घेतला. कोणलाही शंका येऊ नये यासाठी त्याने मृतदेहाचे फार छोटे छोटे तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे करण्याआधी आपण दारु पित होतो, तसेच दुर्गंध येऊ नये यासाठी तोंडावर मास्क किंवा कपडा बांधत होतो असे ही त्याने सांगितले. मृतदेहाचे ३५ तुकडे केल्यानंतर आफताबने ते सर्व फ्रीजमध्ये ठेवले. सोबतच डझनभर डिओड्रंट, परफ्यूम आणि सुंगंधी काड्याही भरल्या.पुढील १६ दिवस आफताब मृतदेहाची विल्हेवाट लावत होता. रोज रात्री २ वाजता तो मृतदेहाचे एक किंवा दोन तुकडे बॅगेत भरुन घराबाहेर पडत असे. रोज नव्या ठिकाणी जाऊन गटार किंवा जंगलाच्या भागात तो मृतदेहाचे तुकडे फेकून देत होता. कचरा वेचणाऱ्यांना शंका येऊ नये यासाठी त्याने त्याचे आणखी छोटे तुकडे केले. मृतदेहाचा तुकडा फेकून दिल्यानंतर ती पिशवी तो दुसऱ्या ठिकाणी फेकून देत होता.आफतबाने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची ठिकाणे सांगितल्यानंतर मेहरुलीच्या नाल्यात काही हाडं सापडली असून ही श्रद्धाची असावीत असा त्यांचा अंदाज आहे. जर श्रद्धाचा डीएनए या हाडांशी जुळला तर पोलिसांकडे मोठा पुरावा असेल.
दरम्यान, दिल्ली कोर्टाने आफताबला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच पोलिसांना नार्को-चाचणी करण्यासही परवानगीही दिली आहे. पोलीस आफताबला घेऊन हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडलाही जाणार असल्याचे वृत्त आहे. चौकशीदरम्यान, आफताबने आपण देहरादूनमध्येही मृतदेहाचे काही तुकडे फेकल्याचे सांगितले होते. आफताब आणि श्रद्धा फिरण्यासाठी गेलेल्या ठिकाणांची पोलीस पाहणी करणार आहेत. पोलिसांच्या हाती काही पुरावे अद्यापही लागलेले नाहीत. यामध्ये आफताबने वापरलेला चाकू, श्रद्धाचे डोकं किंवा ओळख सिद्ध करणारा शरिराचा इतर भाग, तिने त्यादिवशी घातलेले कपडे आणि मोबाईल फोन यांचा समावेश आहे. आफताबने मोबाईल दिल्ली किंवा मुंबईत फेकून दिला असल्याचा संशय आहे.
Shraddha Murder Case | Shraddha Murder Case
Bharat Jodo Yatra | इंदुरमध्ये राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी