SanjayRautNewsUpdate : खा. संजय राऊत यांच्या विरोधात ईडी पुन्हा सक्रिय…

मुंबई : खासदार संजय राऊत ईडीच्या कोठडीतून बाहेर येत नाहीत तोच एकीकडे राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहेत तर दुसरीकडे त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी मुंबई हाय कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. ईडीच्या समन्सनुसार शुक्रवार, दिनांक १८ नोव्हेंबरला राऊत यांना ईडीच्या बलार्ड पीयर येथील क्षेत्रीय संचालनालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. तर जामीन अर्जावर २५ ला हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळ्यातील पैशांचा गैरवापर केल्याचा संजय राऊत यांच्यावर आरोप आहे. त्यासाठी ‘ईडी’ने त्यांना अटक करुन १०० दिवस कोठडीत ठेवले होते. अलिकडेच त्यांना न्यायालयाने जामीन दिला. मात्र त्यानंतर ‘ईडी’ ने त्यांना पुन्हा समन्स बजावले आहे. दरम्यान न्यायालयाने जामीन देताना राऊत यांना ईडीच्या चौकशीला सहकार्य देण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच राऊत यांना जामीन मिळाला असला तरी या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. यामुळे चौकशीसाठीच त्यांना समन्स बजाविण्यात आले आहे.
जामीन अर्जावर २५ ला हायकोर्टात सुनावणी
संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला होता. पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ९ नोव्हेंबरला जामीन दिला होता. ईडीने संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची मागणी पीएमएलए कोर्टात केली होती. मात्र, ईडीची मागणी पीएमएलए कोर्टानं फेटाळली होती. ईडीने त्याच दिवशी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने ईडीच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता.
दरम्यान ईडीच्या याचिकेतील त्रुटी दाखवून देत याचिका नव्याने सादर करण्यास सांगितले होते. ईडीनं संजय राऊत यांच्या विरोधात सुधारित याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. ईडीच्या याचिकेवर २५ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे पीएमएलए कोर्टानं प्रवीण राऊत यांना देखील जामीन मंजूर केला होता. पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांना जामीन देताना ईडीवर ताशेरे ओढले होते. पीएमएलए कोर्टाच्या निकालाला ईडीने आता मुंबई हायकोर्टात देखील आव्हान दिले आहे.